सुरेश काटेतलासरी : पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील सूत्रकार डोंगरपाडा येथील शाळेतील शिक्षकाने रोजंदारीवर नेमलेल्या शिक्षकाचेही लक्ष नसल्याने विद्यार्थी पत्ते खेळत असल्याचे धक्कादायक वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच, प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शिक्षक परस्पर रजेवर गेलेल्या डोंगरपाडा शाळेला तत्काळ पर्यायी शिक्षक देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षकावर कारवाईसाठी अहवाल मागितला आहे.
तलासरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निमेश मोहिते यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमून अहवाल मागितला आहे, तसेच पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी घटनेचा अहवाल तलासरी शिक्षण विभागाकडून मागितला आहे. अहवालानुसार शिक्षक रविकुमार फेरे यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.