मयूर गलांडे
मुंबई/सोलापूर - सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील धामणगावच्या एका वृद्ध दाम्पत्याच्या दुबार पेरणीचे वृत्त लोकमत. कॉमने प्रकाशित केले होते. या बातमीनंतर आणि ट्विटरवरील व्हिडिओनंतर हरहरी ढेकणे यांना मदतीचा ओघ सुरु झाला आहे. लोकमतचे वृत्त सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर या आजी-आजोबांसाठी नेटीझन्सने पुढाकार घेऊन मदतीचा हात दिला. तर, बार्शी तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांनीही दखल घेऊन तात्काळ संबंधित कृषी अधिकाऱ्यांना या गरीब शेतकऱ्याच्या शेतात पाठवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चार दिवसांपूर्वी देशातील 80 कोटी नागरिकांना दिवाळीपर्यंत मोफत धान्य देण्याची घोषणा केली. त्यावेळी, हे धान्य सरकार तुम्हाला मोफत देऊ शकतंय ते केवळ बळीराजामुळेच. शेतात घाम गाळून, कष्ट करुन मातीतून सोनं पिकविणाऱ्या माझ्या शेतकऱ्यामुळेच मी हे धान्य तुम्हाला देतोय, असे मोदींनी आवर्जुन सांगितले. सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील धामणगावच्या एका वृद्ध दाम्पत्याकडे पाहिल्यानंतर मोदींचं ते वाक्य शतप्रतिशत सत्यवचन असल्याची प्रचिती येते. कारण, आपल्या कोरडवाहू शेतात दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जातानाही 80 वर्षीय नरहरी ढेकणेंमधला कष्टकरी बळीराजा आपल्याला अन्नपूर्णाची साक्ष देतोय.
शेतात राबणाऱ्या नरहरी बाबांना भेटल्यावर म्हटलं, आता घ्या की रिटायरमेंट शेतीतून. तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तरानं मीही स्तब्ध झालो. 'लेकरा, शेतकऱ्याला कसला आईतवार अन् कसली रिटारमेंट, असं त्यांनी हसत हसत म्हटलं'. आपल्या कोरोडवाहू जमिनीत 75 वर्षीय पत्नी सोजरसह दुबार पेरणी करतानाचा त्यांचा व्हिडिओ पाहून तुमच्या पोटाला पीळ पडला नाही तर नवलचं. लोकमते या वृद्ध दाम्पत्याच्या दुबार पेरणीची करुण कहानी मांडली होती. त्यासोबतच, व्हिडिओही शेअर केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर, नेटीझन्सडून त्यांना मदतीचा ओघ सुरु झाला असून तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांनीही दखल घेतली आहे.
बार्शीत तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांनी बातमी सजल्यानंतर सूचना देत कृषी सहायक सयाजी पाटील यांना ढेकणे दाम्पत्याची भेट घेण्यास सागितलं. त्यानंतर, सयाजी पाटील यांनी शेतावर जाऊन त्यांना काय हवं नको याची चौकशी केली. बीयाणे व खतांची आवश्यक पूर्तता करुन शेतात एक मजूर लावून त्यांची सर्व काम करुन दिली जातील, असेही सांगितले. वृद्ध शेतकरी ढेकणे दाम्पत्याला हवी ती मदत कृषी विभागामार्फत करण्यात येईल, असे आश्वासनही कृषी अधिकारी शहाजी कदम यांनी दिले.
धामणगावातील नरहरी ढेकणे यांना 8 एकर कोरडवाहू जमिन असून आता थरथरत्या हाताना जमिन पिकवणं जमत नाही. म्हणून केवळ गरजेपुरती 2 एकर जमिन पिकवून गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. वयाची साठी ओलांडली की माणसानं आराम करावा, नातवंडात रमावं अन् आनंदी जीवन जगावं असं म्हटलं जातं. पण, नरहरी ढेकणे व सोजर ढेकणे या वृद्ध शेतकरी दाम्पत्याच्या नशिबी हे सुख नाही. मुलबाळ नसल्याने वयाच्या 80 व्या वर्षीही संसाराचा गाडा स्वतःलाच हाकावा लागतोय. गावात रहायला पक्के घर नसल्याने आजही पत्र्याच्या शेडमध्येच या राजा-राणीचा प्रेमाचा संसार सुरु आहे. आपल्या शेतात थोडंस पिक घेऊन, त्यातून थोडासा पैसा मिळवून उरलेला आयुष्य जगायचा दिनक्रम या जोडप्याचा आहे. राजानं मारलं अन् पावसानं झोडपलं... मग सांगणार कोणाला, अशीच परिस्थिती सध्या ढेकणे दाम्पत्याची झाली आहे. मात्र, त्यांची ही अवस्था पाहून अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. तर, कृषी विभागानेही या शेतकरी कुटुंबाची दखल घेत सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.