Join us

लोकमत इम्पॅक्ट: मढ-वर्सोवा पुलाच्या टेंडरसाठी २०२९ कोटी रुपयांची  बोली

By मनोहर कुंभेजकर | Published: July 29, 2024 10:05 PM

पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने या वृत्ताला दुजोरा दिला.

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई  : अंधेरी पश्चिम येथील महत्वाकांक्षी मढ-वर्सोवा उड्डाण पुलाचे टेंडर अँप्को इन्फ्राटेक प्रा. लि कंपनीने पटकावले आहे. या कंपनीने सर्वात कमी किंमतीची २०२९.८० कोटी रुपयांची बोली लावली होती. या संदर्भात आजच्या लोकमतच्या अंकात मढ-वर्सोवा पू लाची निविदा अंतिम टप्यात असे वृत्त दिले होते. पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने या वृत्ताला दुजोरा दिला.

मढ बेट-वर्सोवा दरम्यान २२ किमीचे अंतर स्वामी विवेकानंद मार्गाने कापण्यासाठी ४५ ते ९० मिनिटे इतका वेळ लागतो, मात्र हा पूल पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत हे अंतर गाठता येणार आहे.मढ-वर्सोवा दरम्यान १.५३ किलोमीटर लांब केबल आधारित पूल निर्मितीचे हे काम आहे. या नव्या पूलामुळे दोन्ही भागांतील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, मच्छीमार बांधव, व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.

मुंबईतील वाहतूककोंडीवर उपाय म्हणून उड्डाणपुलांचे जाळे वाढवले जात आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणात नवीन पूलांची उभारणी करण्यात येत आहे. मढ ते वर्सोवा थेट सार्वजनिक वाहतुकीचा एकमेव मार्ग म्हणजे वेसावा मच्छिमार सहकारी सोसायटीची फेरीबोट सेवा आहे.त्यामुळे मढ किंवा वर्सोवा येथे जाण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्ग किंवा स्वामी विवेकानंद मार्ग असे दोन अन्य वाहतुकीचे पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. काही वर्षांपासून नवीन पुलाची मागणी केली जात होती. 

मालाड पश्चिमेकडील मढ परिसर आणि अंधेरीतील वर्सोवा हा भाग सागरी किनारपट्टीने वेढलेला आहे. त्यामुळे या भागांत प्रवासासाठी फेरी बोटीचा वापर होतो. येथील वाहतूक अधिक जलद करण्यासाठी मढ ते वर्सोवा या पूलाचा पर्याय काढण्यात आला. 

दरम्यान आपण गेली दहा वर्षे केलेल्या पालिका प्रशासन, राज्य व केंद्र सरकारकडे केलेल्या  पाठपुराव्याला यश आल्याचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितले. तर मागील अनेक वर्ष हा सागरी सेतू व्हावा यादृष्टीने मी प्रयत्नशील होतो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या सागरी सेतू प्रकल्पासाठी लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी विशेष प्रयत्न केले गेले. अखेर सर्व अडथळे पार करत हा सागरी सेतू साकारणार आहे याचा निश्चितच आनंद झाल्याचे माजी मंत्री व मालाड पश्चिमचे काँग्रेसचे स्थानिक आमदार अस्लम शेख यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई