मनोहर कुंभेजकर, मुंबई-पी उत्तर विभाग कार्यालयाचे विभाजन करून मालाड पूर्वेच्या रामलीला मैदानातील कुंदनलाल सैगल नाट्य गृहाच्या इमारतीत पी (पूर्व) नवीन विभाग कार्यालय उभारण्यात आले आहे.उद्या बुधवार दि,4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता उपनगर पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या नव्या विभाग कार्यालयाचे उदघाटन होणार आहे.त्यामुळे मुंबईतील पालिकेच्या विभाग कार्यालयांची संख्या आता 25 होणार आहे.
यावेळी खासदार गोपाळ शेट्टी,खासदार गजानन कीर्तिकर, आमदार अतुल भातखळकर,आमदार सुनील प्रभू,आमदार अस्लम शेख,आमदार राजहंस सिंह आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिगावकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
पालक मंत्र्यांच्या सदर नवीन विभाग कार्यालयाचे हस्ते उदघाटन व्हावे असा हट्ट प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी धरला आहे.परंतू पालक मंत्र्यांनाच वेळ मिळत नसल्याने कार्यालय तयार होवून देखिल पी (पूर्व) नवीन विभाग कार्यालयाचे उदघाटन रखडले असल्याचे पत्र आमदार सुनील प्रभू यांनी पालिका आयुक्त डॉ.इकबाल सिंह चहल यांना दिले होते.
अखेर पितृपक्षातच सदर नवे कार्यालय सुरू करण्यासाठी उपनगर पालक मंत्र्यांना वेळ मिळाला! अशी टिपणी शिवसेना ( उबाटा) विधिमंडळ मुख्य प्रतोद,दिंडोशीचे स्थानिक आमदार,माजी महापौर सुनील प्रभू यांनी केली. सामान्य दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील सामान्य नागरिकांना सुविधांपासून वंचित राहावे लागते.त्यामुळे जनतेला सुविधा मिळण्यासाठी पी (पूर्व) नवीन विभाग कार्यालय तात्काळ सुरू करावे यासाठी आपण गेली 15 दिवस पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे.परंतू अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने गणेशोत्सवा पूर्वी सदर कार्यालय सुरू करावे अशी मागणी देखिल त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती.याबाबत सर्वप्रथम लोकमत ऑनलाइन मध्ये दि,16 सप्टेंबर रोजी सविस्तर वृत्त दिले होते.