लोकमत इम्पॅक्ट - कांदळवन कत्तलीच्या सखोल चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 11:19 AM2023-04-25T11:19:30+5:302023-04-25T11:19:58+5:30
तहसीलदारांनी घेतली दखल : घटनास्थळाची तातडीने पाहणी
मुंबई : कांदिवली येथे चारकोप सेक्टर आठ परिसरात कांदळवन उद्धस्त करून भू-माफियांकडून होत असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत सोमवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत बाेरीवली तहसीलदार कार्यालयाने घटनास्थळाची अतितातडीने पाहणी केली. याबाबत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही संबंधित विभागांना दिले आहेत.
तहसीलदार कार्यालयाने उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण/निष्कासन), महापालिकेच्या आर/मध्य विभागाचे सहायक आयुक्त, चारकोप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, नगर भूमापन फ अधिकारी, मंडळ आणि तलाठी यांना तातडीने पत्र पाठवून सोमवारी दुपारी अडीच वाजता घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी सखोल चौकशी करून वस्तुस्थिती तपासण्यात यावी, पाहाणीअंती कारवाई करणे आवश्यक असल्यास पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच जीपीएस, रीडिंग, पंचनामा अहवालासह सीआरझेड अधिसूचनेचे उल्लंघन झाले असल्यास गुन्हा नोंद करून अहवाल तत्काळ सादर करण्यात यावा, अशाही सूचना संबंधित कार्यालयांना तहसीलदार कार्यालयाने दिल्या आहेत.
पत्रात नमूद केल्यानुसार दुपारी अडीच वाजता पाहणी ठेवण्यात आली होती. या पत्राची प्रत तक्रारदारांना देण्यात आली. मात्र, आपल्याला फोनवरून कळवण्यात आले नाही तर वेळ उलटून गेल्यावर आपल्या कार्यकर्त्याला दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी व्हाॅटसॲपवर हे पत्र पाठवण्यात आले. त्या मेसेजमधील पत्रात आपण स्थळपाहणीसाठी उपस्थित न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत पाहणी करून त्यानंतर आपले म्हणणे ऐकले जाणार नाही, असे नमूद केले. यावरून अधिका-यांची भूमिका स्पष्ट होते, असे तक्रारदार युनायटेड असोसिएशन फॉर सोशल, एज्युकेशनल ॲन्ड पब्लिक वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष रेजी अब्राहम यांनी म्हटले आहे.