मनोहर कुंभेजकर
मुंबई - सहार कार्गो रोडवर असणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ वॉचडॉग फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत सहार कार्गो रोडला मुंबई महानगर पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांचे नाव दिले. त्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. के पूर्व वॉर्डचे सहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत सकपाळे यांनी लोकमतच्या वृतांची दखल घेतली.
काल रात्री 11.30 ते आज दि,1 च्या पहाटे 3 पर्यंत येथील खड्डे वॉचडॉग फाउंडेशनच्या देखरेखीखाली नवीन पेव्हर ब्लॉक व अन्य सामुग्री टाकून दुरुस्ती विभागाचे अधिकारी राठोड आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी येथील खड्डे बुजवले अशी माहिती वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त निकोलस अल्मेडा आणि गॉडफ्रे पिमेटा यांनी दिली.
सहार कार्गो येथे रोज सुमारे 2000 ट्रक आणि अवजड वाहने मार्गक्रमण करतात. मात्र या रस्त्यावर खड्यांचे मोठे साम्राज्य होतेमात्र याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका प्रशासन व जिव्हीके कंपनी यांना जाब विचारण्यासाठी काल वॉचडॉग फाउंडेशन या अशासकीय संस्थेच्या सुमारे 50 कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत काल सकाळी चक्क सहार कार्गो रोडचे मुंबई महानगर पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या नावे श्री प्रवीण परदेशी मार्ग असे प्रतिकात्मक नामकरण केले होते.
या रस्त्यावरील खड्डे बुजवण्या ऐवजी आमच्या अख्यारतीत हा रस्ता येत नाही असे सांगून टोलवा टोलवी केली जात होती.त्यामुळे आमची आणि सहार गावातील नागरिकांची सहनशक्ती संपली होती. त्यामुळे येथील रस्ता खड्डे मुक्त होण्यासाठी सहार कार्गो रोडचे श्री प्रवीण परदेशी मार्ग नामकरण केले अशी माहिती त्यांनी शेवटी दिली.