लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘समाज कल्याण बोर्ड बंद होण्याच्या मार्गावर’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या बातमीची राज्य सरकारने तातडीने दखल घेतली आहे. समाज कल्याण बोर्डातील निवृत्तिवेतन धारकांसाठीचा निधी वितरित करण्याचा शासन निर्णय मंगळवारी जारी झाला आहे. सध्या कोणत्याही कार्यक्रमाची जबाबदारी नसल्याने राज्य समाज कल्याण सल्लागार मंडळाला कोणी वाली राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती ‘लोकमत’ने मांडली होती.
बोर्डाला २ कोटी ८० लाख ७८ हजार रुपये इतका निधी वितरित करण्यात यावा, असा शासन निर्णय महिला व बालविकास विभागाकडून मंगळवारी जारी करण्यात आला आहे. मुख्यालयातील निवृत्तिवेतन धारकांच्या निवृत्ती वेतनावरील खर्चासाठी संबंधित निधी वितरित करण्यात येणार आहे.
वंचित घटकांसाठी कल्याणकारी सेवा उपलब्ध नव्हत्या तसेच पायाभूत सुविधा स्थापित झाल्या नव्हत्या, अशा काळात १९५३ मध्ये केंद्रीय समाज कल्याण मंडळ अस्तित्वात आले. १९५४ मध्ये मंडळाला मदत करण्यासाठी राज्य समाज कल्याण सल्लागार मंडळे स्थापन करण्यात आली.
‘लोकमत’च्या वृत्तामुळे शासनाने संबंधित निधी वितरणाचा निर्णय घेतला. यामुळे समाजकल्याण बोर्ड मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना खूप आनंद झाला आहे. विशेषतः सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना थकलेले निवृत्तिवेतन मिळणार आहे, अशी माहिती मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"