Join us

लोकमत इम्पॅक्ट : त्या डॅशिंग महिला पालिका अधिकाऱ्याची गोरेगावातील अनाधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई 

By मनोहर कुंभेजकर | Updated: December 5, 2024 23:01 IST

पालिका परिमंडळ ४ चे सहआयुक्त विश्वास शंकरवार व पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांच्या आदेशाने सदर कारवाई केल्याची माहिती जाधव यांनी लोकमतला दिली.

मुंबई - पालिकेच्या पी दक्षिण विभागाच्या लायसन्स विभागाच्या डॅशिंग वरिष्ठ अधिकारी नूतन जाधव यांनी काल दुपारी गोरेगाव पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील १५० मीटरच्या आतील अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई केली. पालिका परिमंडळ ४ चे सहआयुक्त विश्वास शंकरवार व पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांच्या आदेशाने सदर कारवाई केल्याची माहिती जाधव यांनी लोकमतला दिली.

मुंबईत सर्वत्र फेरीवाल्यांची समस्या आहे. अजूनही पालिकेची फेरीवाला पॉलिसी अस्तित्वात आली नाही. त्यामुळे फेरीवाले रस्त्यावर,पदपथावर थांड मांडून बसतात.रेल्वेच्या १५० मीटर परिसरात बसण्यास न्यायालयाची मनाई असतांना फेरीवाले सकाळ पासून रात्री पर्यंत रस्त्यावर बसत असल्याने नागरिकांना रस्त्यावर चालता येत नाही,तर वाहनांना कसरत करत त्यांची वाहने न्यावी लागत असल्याने रेल्वे स्थानकाच्या बाहेर वाहतूक कोंडी होते. नूतन जाधव यांच्या धडक कारवाईचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. गोविंद राघो खैरनार हे नाव ऐंशी-नव्वदच्या दशकांमध्ये . गो. रा. खैरनार हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त होते.

उपायुक्तपदावर असताना त्यांनी बेकायदेशीर वास्तूंवर, आणि पदपथावरील बेकायदेशीर विक्रेत्यांवर अतिक्रमणाबद्दल घणाघाती कारवाई केली होती,त्याची आठवण गोरेगाव प्रवासी संघाचे अध्यक्ष उदय चितळे यांनी करून दिली.येथील परिसर फेरीवाला मुक्त करावा यासाठी संघाने सातत्याने पी दक्षिण विभागाकडे पाठपुरावा केला होता.लोकमतने देखिल याला वाचा फोडली होती असे चितळे म्हणाले. सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांच्या निर्देशानुसार गोरेगाव पूर्व रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर परिसरात अतिक्रमण हटाव कारवाई पी दक्षिण विभागाच्या अतिक्रमण आणि परवाना विभागाद्वारे सुरू आहे.काल सकाळी एकूण २८ दुकानांवर अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली आणि ५ फेरीवाल्यांचे स्टॉल पाडले अशी माहिती जाधव यांनी दिली. गोरेगाव पूर्व स्थांनकाबाहेर एका हॉटेलवाल्याने बाहेर अनाधिकृत बाकडे मांडले होते.

यावेळी जो सगळ्यांना न्याय तो तूला न्याय असे ठोसपणे सूनावले आणि कारवाई केल्याची माहिती त्यांनी दिली. पालिकेला पुन्हा माजी उपायुक्त गो.रा.खैरनार यांच्या रूपाने फेरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या धाडसी अधिकारी मिळाल्याची चर्चा गोरेगावकरांमध्ये सुरू झाली.पालिकेच्या आणि त्यांच्या धाडसी कारवाईचे गोरेगाव मध्ये फेरीवाल्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांकडून सर्वत्र कौतूक होत आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाफेरीवाले