Join us

लोकमत इम्पॅक्ट : पश्चिम दुर्तगती महामार्गावरील मागाठाणे जंक्शन येथील वाहतूक कोंडी सुटणार

By मनोहर कुंभेजकर | Published: November 01, 2023 5:45 PM

येत्या एक महिन्यात सदर काम पूर्ण होणार आहे.

मुंबई- पश्चिम दुर्तगती महामार्गावरील मागाठाणे सिग्नल येथे कायम वाहतूक कोंडी होते. येथील अनेक सोसायट्यांमधील नागरिकांना पश्चिम दुर्तगती महामार्गावर यायला एकच प्रवेशद्वार आहे. त्यामुळे या मार्गावरील बोरिवली पूर्व दत्तपाडा सिग्नलपूर्वी उड्डाणपूला खालून उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे फ्री यु टर्न द्यावा अशी मागणी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी एमएमआरडीए कडे एका पत्राद्वारे केली होती. त्यासंदर्भात लोकमतच्या अंकात दि. 27 एप्रिल 2022 रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते.

मागाठाणे उड्डाणपुलासमोर नॉर्थ बॉण्ड वर वाहतूक सुरळीत राहण्यासाठी नवीन दोन सिग्नलचे उदघाटन तसेच वाहनांना फ्री यू टर्नच्या कामाचे भूमिपूजन खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते पार पडले. येत्या एक महिन्यात सदर काम पूर्ण होणार आहे.

येथे यु टर्न होणार असल्याने  वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील रिवाली पार्क (विंटर ग्रीन, व्हाईट स्प्रिंग (ए आणि बी), समर्पण कॉम्प्लेक्स ( ए आणि बी, सी आणि डी), समर्पण रॉयल, सनटेक, वसंत मार्व्हल कॉम्प्लेक्स (क्राऊन, ग्लोरी, मॅग्नम, क्लॅरीऑन, ग्रॅंड्यूअर, ग्रेस) व इतर गृहनिर्माण सोसायट्यांमधील सुमारे 3000 वाहनांना याचा फायदा घेता येईल.

या कामातील विविध शासकीय अधिकाऱ्यांचा ताळमेळ व योग्य समन्वय तसेच सातत्यपूर्ण पाठपुरावा भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुधीर सरवणकर यांनी केला होता.

या प्रसंगी माजी नगरसेविका आसावरी पाटील, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, महामंत्री दिलीप पंडित, बाबा सिंग, बोरिवली विधानसभा अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता, मागाठाणे विधानसभा अध्यक्ष दिलीप उपाध्याय तसेच जिल्हा, मंडळ, वॉर्ड स्तरावरील कार्यकर्ते तसेच येथील वसंत मार्व्हल, समर्पण, रिवाली पार्क कॉम्प्लेक्स मधील संस्थेचे पदाधिकारी, रहिवासी तसेच इतर मान्यवर सदर कार्यक्रमाला उपस्थित होते. 

टॅग्स :मुंबईवाहतूक कोंडी