लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सिडकोच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचे काम सुरू असून मार्च, २०२५ मध्ये या विमानतळावरुन देशांतर्गत विमान सेवा करण्याच्या दृष्टीने काम प्रगतिपथावर आहे. याच्या एका धावपट्टीचे काम पूर्ण झाले असून उद्या शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या या धावपट्टीवर वायुदलाच्या ताफ्यातील सी -१३० हे वाहतूक दोन दुहेरी टर्बोप्रॉप इंजिन असणारे हे विमान त्याच्या वैशिष्ट्यांमुळे वायू दलाच्या ताफ्यात आणि संरक्षण दलात महत्त्वाची निवड ठरते. या शिवाय हवाई दलाचे सूखोई हे विमान ही धावपट्टीपासून काही अंतरावर उडणार असल्याची माहिती सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.
लोकमत समूहातर्फे आयोजित इन्फ्रा कॉनक्लेव्हमध्ये ते बोलत होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ११६० हेक्टर जमिनीवर उभारले जात आहे. भूसंपादन व इतर तांत्रिक कारणांमुळे नवी मुंबईच्या विमानतळावरून प्रत्यक्ष उड्डाण होणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र गेल्या तीन वर्षांत या विमानतळाच्या बांधकामाला वेग आला आहे. पहिल्या टप्प्यातील धावपट्टीचे काम पूर्ण झाल्यावर विविध चाचण्या सुरू आहेत.
महत्त्वाचे म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वांत मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ म्हणून साकारण्यात येत असून प्रवाशांच्या सोयी सुविधांसह, मल्टी मॉडल कनेक्टीव्हीटी या विमानतळावर उपलब्ध असणार असल्याची माहिती सिंघल यांनी दिली.