Join us

मुंबईत हवाई क्षेत्राचा विस्तार आवश्यक; हवाई वाहतूकतज्ज्ञ मंदार भारदे यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 11:46 AM

हेलिपोर्ट किंवा विमानतळाच्या बाबतीत न्यूयॉर्क आणि मुंबईची तुलना केल्यास आपण अजून खूप मागे आहोत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : हेलिकॉप्टरसेवा म्हणजे फक्त अतिश्रीमंतांसाठी हा चुकीचा समज आहे. मुंबईच्या लोकसंख्येची घनता लक्षात घेता हवाई क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढवणे गरजेचे आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, आग विझविण्यासाठी, रुग्णाला शहराच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडील रुग्णालयात नेण्याच्या दृष्टीने अधिकाधिक हेलिकॉप्टरची किंबहुना हेलिपोर्टची गरज असल्याचे एमएबी एव्हिएशनचे व्यवस्थापकीय संचालक मंदार भारदे म्हणाले.

हेलिपोर्ट किंवा विमानतळाच्या बाबतीत न्यूयॉर्क आणि मुंबईची तुलना केल्यास आपण अजून खूप मागे आहोत. भविष्यात हवाई क्षेत्राचा, त्यातही हेलिपोर्टची संख्या वाढली पाहिजे. फक्त मुंबईच नाही, तर एकूणच मुंबई महानगर क्षेत्रात हवाई क्षेत्रात पायाभूत सुविधांमध्ये वाढ होणे आवश्यक आहे. मुंबईत तीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, पाच हेलिपोर्ट, सहा ते सात विभागीय विमानतळे, ठाण्यात दोन हेलिपोर्ट आणि अलिबाग, जेएनपीटी, उरणमध्ये प्रत्येकी एक हेलिपोर्ट उभारणे गरजेचे असल्याचे भारदे म्हणाले.

मुंबईसारख्या ठिकाणी या सेवेचा अनेक प्रसंगात उपयोग होऊ शकतो. मुंबईला समुद्राचे वरदान लाभले आहे. त्या ठिकाणी तरंगते हेलिपोर्ट उभारता येऊ शकते. 

मुंबईत प्रशस्त बस डेपो आहेत. त्याही ठिकाणी हेलिकॉप्टर उभी करता येऊ शकतात. बहुमजली इमारतीच्या टेरेसवरही  हेलिकॉप्टर सरकारी खर्चाने तैनात करता येऊ शकतात. त्यांचे नियंत्रण करता येऊ शकते. रेल्वेस्थानकांच्या वरही त्यांच्यासाठी व्यवस्था करता येऊ शकते. काही हेलिकॉप्टरमध्ये आग विझविण्याची सुविधा असते.  फायर ब्रिगेडची गाडी जिथे पोहोचणे अवघड असते तेथे अशा हेलिकॉप्टरचा वापर  करता येईल, असेही ते म्हणाले. 

 

टॅग्स :लोकमत इव्हेंट