नवीन शहराच्या विकासासाठी फक्त सिडको; नैना, नवी मुंबई विमानतळासह पायाभूत सुविधांचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 11:20 AM2024-10-11T11:20:57+5:302024-10-11T11:21:27+5:30
नैना, पनवेल कर्जत रेल्वे कॉरिडॉर, आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्कसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्हमध्ये दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : १९७० साली नवीन शहरे वसविण्यासाठी आणि तेथे नागरिकांना मूलभूत तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सिडकोची स्थापना करण्यात आली. सिडको आतापर्यंत ३०० चौरस किमीहून अधिकच्या क्षेत्रात पसरले असून त्याची व्याप्ती वाढवत आहे. याच पार्श्वभूमीवर सिडकोचे वर्तमान आणि भविष्यात होऊ घातलेले प्रकल्प यांचा वेध सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्हमध्ये घेतला. नैना, पनवेल कर्जत रेल्वे कॉरिडॉर, आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्कसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्णत्वाकडे येत असून ९ कोटी लोकसंख्या प्रतिवर्ष एवढी या विमानतळाची क्षमता आहे. या विमानतळाचे वैशिष्ट्य म्हणजे रेल्वे, मेट्रो, रस्ते वाहतूक तसेच पाण्यातून वाहतूक अशी मल्टी मॉडल कनेक्टिव्हिटी असणार आहे. याशिवाय सिडकोकडून विमानतळाला अधिक कनेक्टिव्हिटीसाठी उलवे कोस्टल रोडच्या बांधकामाची तयारी सुरू केली आहे. हा प्रकल्प सुमारे १५०० कोटींचा असल्याचे सिंघल यांनी सांगितले. याशिवाय मेट्रो ८ कडून जुने आणि नवीन विमानतळ कनेक्ट केले जाणार आहे. विमानतळाच्या बाजूला नवीन शहरासाठी सरकारने सिडकोला २०१३ मध्ये २२५ चौरस किमी जागा उपलब्ध करून दिली. ११ वर्षांनंतर येथील प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून यामध्ये पनवेल व उरणमधील ९४ गावांचा समावेश असणार आहे. ही एक मॉडर्न सिटी असणार असून गार्डन, मनोरंजन पार्क, पायाभूत सुविधा या सगळ्यांचा समावेश असणार आहे.
सिडकोकडून २६ हजार महा गृहनिर्माण प्रकल्पाची सोडत ही दसऱ्यादिवशी केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. बीकेसीच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क बनविण्यात येणार आहे. १५५ हेक्टर जागेवर बनविण्यात येणारे हे पार्क बीकेसीपेक्षा अधिक सुविधांनी युक्त असेल, असे सिंघल यांनी सांगितले. याशिवाय सामान्यांसाठी खारघर व्हॅली गोल्फ क्लब निर्माण करण्यात येणार असून, काही रुपयांत सामान्यांनाही गोल्फचा आनंद घेता येणार आहे. १०३ हेक्टरवर तयार होणारे हे पार्क सिडकोच्या उत्तम बांधकामांपैकी एक असेल, असे सिंघल म्हणाले.
३५० दशलक्ष लिटर पाणी मिळणार
नवी मुंबईला विविध प्रकल्प उभे राहत असताना पाण्याचा तुटवडा होऊ नये यासाठी कोंढाणे धरणाची निविदा प्रक्रिया झाली असून, काही काळात काम सुरु आहे. या धरणामुळे ३५० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार असून, नैना प्रकल्पाला पाणीटंचाईच्या झळा बसणार नाहीत, असे सिंघल यांनी म्हटले. पालघर मुख्य कार्यालयाची जबाबदारी ही राज्य सरकारकडून सिडकोकडे देण्यात आली आहे. त्यामुळे सिडको हे भविष्य असून पायाभूत व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव कार्यतत्पर असेल, असे सिंघल यांनी सांगितले.