राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरची होणार: डॉ. संजय मुखर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 11:13 AM2024-10-11T11:13:59+5:302024-10-11T11:14:37+5:30

वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या सहकार्यातून ‘एमएमआर’मध्ये माेठी गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न.

lokmat infra town hall conclave 2024 sanjay mukherjee said state economy to become 1 trillion dollar | राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरची होणार: डॉ. संजय मुखर्जी

राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरची होणार: डॉ. संजय मुखर्जी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नीती आयोगाशी सहकार्य करून मुंबई महानगराचा इकोनॉमिक मास्टर प्लॅन तयार केला आहे. एमएमआरडीएने एमएमआर क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी वर्ल्ड इकोनॉमिक फोरमशी सहकार्य केले आहे. मुंबई हे एकमेव शहर आहे, ज्याची थेट वर्ल्ड इकोनॉमिक फोरमशी सहकार्य केले आहे. त्यातून राज्याला १ ट्रिलियन डॉलर इकोनॉमी तयार करण्यासाठी हातभार लागणार आहे, असे प्रतिपादन एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी केले. 

डॉ. संजय मुखर्जी पुढे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य आहे. राज्यात ५६ ते ५८ टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते. शहरांतील लोकसंख्या मुख्यत्वेकरून आफ्रिका आणि आशियात वाढत आहे. त्यातच राज्यातील डेमोग्राफिक डिव्हीडंटही महाराष्ट्राला फायदेशीर आहे. राज्यातील जवळपास ४६ टक्के लोकसंख्या ही २४ वयोगटाखालील आहे. आपली अर्थव्यवस्था ४४४ बिलियन डॉलर्सची आहे. त्यातून देशाच्या  जीडीपीत महाराष्ट्राचे जवळपास १५ टक्के योगदान आहे, असेही मुखर्जी यांनी नमूद केले.

मुंबई महानगरात ३३७ किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे उभारले जात आहे. त्यात ठाणे रिंग मेट्रो आणि नवी मुंबईतील काही मेट्रो मार्गिकांचा समावेश केल्यास यात आणखी वाढ होईल. त्यातून महामुंबईतील हे मेट्रो जाळे जगात एकाच शहरातील सर्वात मोठे मेट्रो जाळे ठरणार आहे. मुंबई महानगरातील मेट्रो जाळ्यामुळे मुंबईतून ठाणे आणि पालघरपर्यंतचा प्रवास तर सुखकर होणारच आहे, मात्र त्याचबरोबर कार्बन फूटप्रिंट घटणार आहे. त्यातून कार्बन उत्सर्जन नेट झिरो होण्यास मदत मिळणार आहे, असेही मुखर्जी यांनी नमूद केले. 

विकासासाठी पायाभूत सुविधा क्षेत्र महत्त्वपूर्ण असते. या पायाभूत सुविधेच्या विकासात मुंबई महानगर अग्रेसर आहे. मुंबईतील काही पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत, तर काही प्रकल्पांची कामे सुरू असून, लवकरच ते पूर्ण होणार आहेत. मुंबईतील चार मेट्रो मार्गिका सेवेत दाखल झाल्या आहेत. तर अन्य मार्गिकाही लवकरच सुरू होतील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळही येणाऱ्या काही महिन्यांत सुरू होणार आहे. वाहतूक सुविधांमधील या विकासामुळे मुंबई महानगरात मोठे बदल झालेले दिसतील. 

मुंबई महानगरात रिंग रस्त्यांचे जाळे

मुंबई महानगरातील पायाभूत सुविधांचा विकास करून लोकांसाठी सुविधा निर्माण करण्याचे काम एमएमआरडीएकडून केले जात आहे. त्यासाठी सर्वसमावेशक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. यानुसार मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या भागापर्यंत पोहोचण्यासाठी १ तासाहून कमी कालावधी लागेल अशा पद्धतीने रिंग रोडचे जाळे उभारले जात आहे. यातील काही प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. तर काहींची कामे सुरू असून, त्यांच्या पूर्णत्वानंतर विनाअडथळा प्रवास करता येणार आहे. 

 

Web Title: lokmat infra town hall conclave 2024 sanjay mukherjee said state economy to become 1 trillion dollar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.