दीड लाख कोटींची मुंबई महापालिकेत कामे सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 11:50 AM2024-10-11T11:50:55+5:302024-10-11T11:51:26+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून, सुमारे २९५ एकर जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ विकसित होणार आहे.

lokmat infra town hall conclave 2024 works of one and a half lakh crore are underway in mumbai municipal corporation  | दीड लाख कोटींची मुंबई महापालिकेत कामे सुरू 

दीड लाख कोटींची मुंबई महापालिकेत कामे सुरू 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईची पालक संस्था म्हणून येथील मुंबईकरांना मूलभूत आणि पायाभूत सुविधा देण्याचे काम मुंबई महापालिका १५० वर्षांपासून  करत आहे. पालिकेचा २०२४-२५ या वर्षाचा अर्थसंकल्प जवळपास ६० हजार कोटी रुपयांचा असून, मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विविध ४३ प्रकल्पांसाठी सुमारे दीड लाख कोटीची कामे सध्या पालिकेकडून घेण्यात आली आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून, सुमारे २९५ एकर जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ विकसित होणार आहे. न्यूयॉर्क, लंडन या शहरांच्या धर्तीवर मुंबई सेंट्रल पब्लिक पार्कमुळे मुंबईची आंतरराष्ट्रीय ओळख अधिक ठळक होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुंबईचे सध्या अस्तित्वात असणारे ३ हजार ९१७ एकर हरित क्षेत्र वाढून आता ४ हजार २१२ एकर इतके होणार असून, हरित मुंबईला हातभार लागणार आहे. 

पालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्प खात्याद्वारे ७ मलजल प्रक्रिया केंद्रांची उभारणी सुरू असून वरळी, वांद्रे, धारावी, वेसावे, मालाड, भांडुप व घाटकोपर या ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारणीची कामे सुरू आहेत. या सातही मलजल प्रक्रिया केंद्रांतून दररोज २ हजार ४६४ दशलक्ष लिटर मलजलावर प्रक्रिया केली जाणार असून  या केंद्रांसाठी १७ हजार १८२ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. खड्डेमुक्त मुंबईसाठी संपूर्ण पालिका क्षेत्रात रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने काँक्रीटीकरण सुरू असून पहिल्या टप्प्यात ३९७ किलोमीटर लांबीच्या रस्ते विकासाची कामे, तर दुसऱ्या टप्प्यात ३७७ किलोमीटर लांबीच्या रस्ते विकासाच्या कामांचे कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. दोन्ही टप्प्यांसाठी पालिकेकडून १३ हजार ८०० कोटी खर्च अपेक्षित आहे. 

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता म्हणजेच कोस्टल रोड हा पालिकेचा वाहतूककोंडी सोडविण्यासाठीचा महत्त्वाचा प्रकल्प असून, प्रकल्पाचे ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे. 

मुंबईतील ठाणे बोरीवली ट्विन टनेल, कोस्टल रोड, फ्रीवे या प्रकल्पांमुळे भविष्यात ठाण्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. मुंबई आणि ठाण्यातील पायाभूत सुविधांचा विकास झाल्यावर प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार असून वाहतूककोंडी घटणार आहे. त्यातून ठाणे शहर सुसह्य होईल. त्याचबरोबर ठाण्यासाठी रिंग मेट्रो आणत आहेत. त्याचाही मोठा फायदा होऊन लोकांचा प्रवास सुखकर होईल. - समीर लोटके, आर्किटेक्ट, समीर एस. लोटके आणि असोसिएटस

सध्या पायाभूत सुविधांची कामे अधिक चांगल्या प्रकारे होत आहेत. कोस्टल रोड, सी लिंक प्रकल्पांमुळे नरिमन पॉइंट अधिक जवळ आले आहे. पश्चिम उपनगरातून हायकोर्टात यायला पूर्वी दीड ते दोन तासांचा वेळ लागत असे. आता ४० ते ४५ मिनिटांत नरिमन पॉइंटला पोहचणे शक्य झाले आहे. मुंबईकरांना यातून मोठा फायदा झाला आहे. एमटीएचएल, मेट्रो यांसारख्या प्रकल्पांमुळे बदल घडत आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उभारणीचा वेग सध्या अधिक आहे. - ॲड. अमित मेहता, सॉलिसिस लेक्सचे व्यवस्थापकीय भागीदार 

इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर हे सत्तेतून पायउतार झाल्यावर घरी सार्वजनिक बसने जातात. आपल्याकडे या घटनेची बातमी होते. मात्र इंग्लंडमध्ये याची बातमी होत नाही. कारण व्हीआयपी लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतील, असा विचारच आपल्याकडे येत नाही. आपण सार्वजनिक वाहतुकीच्या वापराबाबत मानसिकता बदलायला हवी. त्याचबरोबर आपल्याकडे पायाभूत सुविधांची उभारणी करताना त्यांचा दर्जा पाहिला जात नाही. यात बदल व्हायला हवा. त्याचबरोबर रस्त्यांवर खड्डे का पडतात याचा विचार होताना दिसत नाही. आपण पायाभूत सुविधा तयार करतो, मात्र लोकांना सामाजिक नीतिनियमांबाबत जागरूकता नाही. याबाबतही काम होण्याची गरज आहे. - सुधीर किशोर देसाई, प्रोप्रायटर, मातृभूमी डेव्हलपर्स 

रेनवॉटर हार्वेस्टिंग किती सोसायट्यांनी केले आहे. यासाठी कोणत्याही परवानग्यांची गरज लागत नाही. मात्र आपल्याकडे स्वतःहून काही करण्याची मानसिकता नाही. आपल्याला ५ टक्के पाणी पिण्यासाठी लागते, तर ९५ टक्के पाणी वापरासाठी आवश्यक असते. रेनवॉटर हार्वेस्टिंगमधून पाण्याची बचत होऊ शकते. मात्र त्याकडे सर्रास दुर्लक्ष होते. आपल्याकडे शाळांमधून या शिकविले जात नाही, असे बोलले जाते. मात्र मुळात घरातून जबाबदाऱ्यांची जाणीव निर्माण करून दिली जात नाही. त्यातून हा विभाग हे काम करत नाही, तो विभाग ते काम करत नाही अशा तक्रारी केल्या जातात. त्यामुळे आधी आपण मानसिकता बदलायला हवी. - सलील झवेरी, प्रोप्रायटर, सलील इकोलॉजिकल होम्स 
 

Web Title: lokmat infra town hall conclave 2024 works of one and a half lakh crore are underway in mumbai municipal corporation 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.