रसायनशास्त्र, अर्थशास्त्र एकत्रित शिकता आले तर?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 07:17 AM2023-12-24T07:17:11+5:302023-12-24T07:19:09+5:30

प्राध्यापक डॉ. सविता लाडगे यांना नामांकित ‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’चे नायहोम पारितोषिक जाहीर झाले आहे.

lokmat interview mumbai professor dr savita ladage wins prestigious nyholm award for contribution to chemistry | रसायनशास्त्र, अर्थशास्त्र एकत्रित शिकता आले तर?

रसायनशास्त्र, अर्थशास्त्र एकत्रित शिकता आले तर?

रसायनशास्त्र शिक्षणातील योगदानाबद्दल ‘होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन’च्या (एचबीसीएसई) प्राध्यापक डॉ. सविता लाडगे यांना नामांकित ‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’चे नायहोम पारितोषिक जाहीर झाले आहे. भारताच्या दृष्टीने ही आश्वासक बाब. या निमित्ताने त्यांनी लाेकमतसाठी रेश्मा शिवडेकर यांना दिलेल्या मुलाखतीत विज्ञान शिक्षणाचे ‘अणू-रेणू’च उलगडून सांगितले.

रसायनशास्त्र संशोधनात भारत मागे का? 

‘एचबीसीएसई’मधून पीएचडी करताना डहाणू, सोलापूरसारख्या ठिकाणी शाळांमध्ये काम केले. खासकरून आश्रमशाळांमध्ये. त्या वेळी लक्षात आले की, आपल्याकडे विज्ञान शिक्षणाची सुरुवातच चुकीच्या पद्धतीने होते. उदाहरणार्थ रसायनशास्त्रातील रासायनिक सूत्रांचा, आवर्तसारणी यांसारख्या अमूर्त संकल्पनांचा मारा सुरुवातीलाच विद्यार्थ्यांवर केला जातो. या संकल्पना समजून घेताना मुलांना अडचणी येतात.

मग, विज्ञान शिक्षण हे कसे असायला पाहिजे? 

आपल्याकडे विज्ञान शिक्षणात प्रात्यक्षिकांऐवजी बहुतेक भर सिद्धांतावर असतो. अनेक प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना पदार्थ हाताळताही येत नाहीत. अणूरेणूविषयी फार लवकर मुलांना सांगतो. जे कधी अनुभवलेच नाही, ते समजून घेणे कठीण जाते. नंतर पदार्थांचे गुणधर्म शिकवतो. अशाने आपण विज्ञानातील अमूर्त संकल्पनांच्या भाराखाली विद्यार्थ्यांना दाबून टाकतो. पुढे त्याच अमूर्त संकल्पनांच्या आधारावर शिकवत राहतो. ते जे शिकत आहेत, त्याची संगती दैनंदिन जीवनातील अनुभवांशी लावता आली पाहिजे. उदाहरणार्थ अळुवडीत चिंच का घालायची? तर अळूत कॅल्शियम ऑक्झलेट नावाचे स्फटिक असते. त्याच्या टोकदार रचनेमुळे ते घशात टोचून खवखवते. चिंचेतील टार्टारिक आम्लामुळे हे स्फटिक विरघळते. तसेच अतिरिक्त कॅल्शियममुळे किडनी स्टोनसारखा आजार टाळता येतो, असे सांगितले की सहज समजते.

तुम्ही बराच काळ ‘ऑलिंपियाड’सारख्या स्पर्धांकरिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे...

दुर्दैवाने ऑलिंपियाडकडे आपण फक्त स्पर्धा म्हणून पाहतो. ही स्पर्धा नव्हे तर ‘लर्निग प्रोसेस’ आहे. दैनंदिन अनुभवांशी विज्ञानाला जोडता आले तर विद्यार्थ्यांमध्ये व्यापक दृष्टीकोन तयार होतो. ऑलिपियांडमध्ये कूट प्रश्नांना सामोरे जाताना नेमके हेच केले जाते. ऑलिंपियाडच्या आयोजनातून आम्हीही खूप शिकलो. त्याचे शैक्षणिक महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे. यात ८० हून अधिक देश सहभागी होतात. त्यात खुल्या चर्चेच्या आधारे प्रश्न कसे तयार करायचे हे ठरते. मूल्यमापन करतानाही विद्यार्थी-शिक्षक एकत्र येऊन खुली चर्चा होते. ही चर्चा अत्यंत सकस, पारदर्शी असते. अमेरिका, युरोपच नव्हे तर आफ्रिका खंडातील देशांमधील विज्ञान शिक्षणाचा स्तर, दृष्टीकोन समजतो. ऑलिंपियाडचे प्रश्न संकेतस्थळावर उपलब्ध असून ते कुणीही सोडवू शकते.

विज्ञान अध्यापन-अध्यापनात काय बदल व्हायला हवे? 

जगभरात प्रयोगशाळेतील शिक्षण बदलले आहे. अनुभवाधारित डिझाइन तयार करून त्याआधारे विद्यार्थ्यांना विचार करण्यास चालना दिली जाते. आपल्याकडे विषय किती समजला यापेक्षा सर्व भर गुणांवर असतो. विषय समजला तर त्याविषयीची उत्सुकता वाढेल. सरसकट सर्वांनी संशोधनाकडे वळावे असे म्हणणार नाही. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्याकरिता बहुविद्याशाखीय दृष्टीकोन उपयोगी ठरेल. उदाहरणार्थ रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र एकत्रितपणे शिकता आले तर क्षमतवाढीला, नवनिर्मितीला चालना मिळू शकेल. सध्या ‘नॅशनल इनिशिएटिव्ह ऑन अंडरग्रॅज्युएट सायन्स’ (एनआययूएस) या कार्यक्रमांतर्गत निवडल्या गेलेल्या मुलांसमवेत काम करते आहे. त्यात आमचा भर यावरच असतो.

घर आणि करिअर तारेवारची कसरत ठरते का? 

एखादे काम निष्ठेने करत असू तेव्हा कुटुंबीयांचे सहकार्य गरजेचे असते. या बाबतीत सुदैवी राहिले. मुले लहान असताना त्यांना जाणीव करून दिली होती, की मी कायम तुमच्यासोबत नसेन. मुलांना विश्वासात घेऊन सतत संवाद ठेवणे आवश्यक असते.

छंद जोपासणे शक्य होते का? 

मराठी नाटके, चित्रपट माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मग तो कुठल्याही भाषेत असला तरी चालतो. वाचन मात्र मराठीतच जास्त होते.

 

Web Title: lokmat interview mumbai professor dr savita ladage wins prestigious nyholm award for contribution to chemistry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.