कल्याणच्या गल्लोगल्लीत ‘लोकमतच्या’ नाद
By admin | Published: April 13, 2015 10:52 PM2015-04-13T22:52:39+5:302015-04-13T22:52:39+5:30
हिप हिप हुऽऽऽरे हुऽऽऽरे.. चला धमाल करूया .. नाचू या, गाऊ या, खिदळू या बागडू या, चला चला लवकर...चला नाहीतर वेळ निघून जाईल.
हिप हिप हुऽऽऽरे हुऽऽऽरे.. चला धमाल करूया .. नाचू या, गाऊ या, खिदळू या बागडू या, चला चला लवकर...चला नाहीतर वेळ निघून जाईल. मग आपली छबी ही येणार नाही आणि मजा ही लुटता येणार नाही. अशा मूडमध्ये रविवारच्या सकाळी कल्याणमधील बच्चे कंपनीसह आबाल वृध्दांनी एकच जल्लोष केला. निमित्त होते लोकमतच्या ‘धम्माल गल्ली’चे.
उन्हाळयाची सुट्टी लागल्यावर पहिल्याच रविवारी मिळालेल्या संधीमुळे कल्याणमधील बच्चे कंपनीत आनंदाचे वातावरण होते. येथील मेट्रो जंक्शन या मॉलच्या पटांगणावर ही धमाल गल्ली सकाळी ७ ते १० यावेळेत गाजत राहिली. डीजेच्या तालावर अश्विन जोशींच्या सुरेल गाण्यांनी व मधुर स्वरातील गिटारवादनाने ठेका धरून सगळ््यांनाच नाचायला लावले. त्याने काही गाण्यांच्या मुखड्यांच्या सादर केलेल्या रिमिक्स कॉम्बोने ही सगळ््यांना मोहीत केले. त्यानंतर संदीप नासकर याच्या आणि त्यांच्या पथकातील नर्तक निकीता मदान, अभिनव पाटील, प्राजोती शेट्टी, सायली भावसार, अनिकेत गावंड, हृशिकेष देशमुख, ओंकार आंबवणे यांच्या नृत्य व एअरोबिक्सने सगळ््यांनाच थक्क करून टाकले. त्यांना टाळ््यांची दादही भरपूर मिळाली. नाच गाणे झाल्यानंतर बच्चे कंपनीला स्वत: काही तरी करण्याचे किंवा शिकण्याचे वेध लागले. त्यांची ही उर्मी भागविण्यास कॅलिग्राफर निलेश बागवे आणि त्यांच्या अक्षरगंधच्या उल्का बागवे त्यांच्या सहकारी अनुनया जैन-दांगडे यांनी बच्चे कंपनीला अक्षरश: खिळवून ठेवले. चित्रकला म्हणजे महागडे रंग, कॉस्टली ब्रश व उच्च दर्जाचे कागद असे समीकरण सगळ््यांच्या मनात असते. परंतु, सहज मिळणारे व परवडणारे वॉटर कलर, वापरून झालेले टूथब्रश आणि साधा ड्रॉर्इंगपेपर याच्या सहायाने अप्रतिम कॅलिग्राफी कशी साकारावी याचा वस्तूपाठच त्यांनी घालून दिला. कोणत्याही कागदाचा बोळा, कपड्याचा बोळा, स्पंजचा तुकडा, थर्माकोलचा पिस, कोणत्याही पदार्थाचा छोटासा तुकडा याचा वापर करून आपण कुठल्याही रंगातून कोणत्याही कागदावर उत्तम कॅलिग्राफी करू शकतात याची त्यांनी घडविलेली प्रात्यक्षिके सगळ््या बच्चेकंपनीच्या आणि पालकांच्या मनातला चित्रकार जागवून गेली कॅलिग्राफिच्या कॅम्पसमध्ये अक्षरांसह शब्दांची जादू बघण्यासाठी झुंबड उडाल्याचे दृश्य होते. ग पासून गजानन,गणपती, गल्ली. तर ल पासून लोकमत, ध पासून धमाल अशा असंख्य शब्द रचनांसह आकर्षक रंगसंगतीने सर्वांनाच मोहीत केले होते. चित्रासोबत येते ती रांगोळी. संस्कार भारतीच्या रांगोळ््यांचे प्रात्यक्षिक प्रख्यात रंगावलीकार सुनिता देसाई यांनी घडवून सगळ््यांची मने जिंकून घेतली. कलाविष्कार करण्यासाठी निरोगी शरीर आणि स्वस्थ मन याची आवश्यकता असते. म्हणून आरोग्याची साधना कशी करायची याचे धडे बच्चे कंपनीला ब्रह्माड आयुर्वेदचे सूत्रधार डॉ. अक्षय भोईर यांनी दिले. प्राणायामाचा कालावधी कसा वाढवावा ओमच्या उच्चाराणाने व तो लांबविल्याने आपण प्राणायाम म्हणजेच श्वास लांबविण्याचा काळ कसा वाढवू शकतो याचे प्रात्यक्षिक त्यांनी घडविले. तसेच सहज सोप्या व्यायाम प्रकाराचे धडे दिले. त्यानंतर पुन्हा योगाचा ‘अनुलोम’ ‘विलोम’ श्वासाचा सराव झाल्यानंतर संदीप डान्स स्टुडीओतर्फे उपस्थितांना विविध गाण्यांवरील बहारदार नृत्याविष्काराचे दर्शन घडविले. त्यामध्ये उपस्थितांना सहभागी करून घेतल्याने प्रचंड उत्साह व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. आधी कुणाला नाचायला आवडते असे म्हणून बच्चे कंपनीला आमंत्रित करायचे व त्यांनी थोडेसे नृत्य केल्यावर आता तुम्ही प्रत्येकाने तुमच्या पाठीमागे असलेल्या एकाला नाचण्यासाठी घेऊन यायचे, असे सांगितल्यावर एकच धमाल आली. त्यातून सगळेचजण नृत्यकरण्यास सज्ज झाले. आधी नुसत्या उड्या, मग तालबद्ध उड्या मग स्टेप्स अशा सोप्यारितीने त्यांनी उत्तम समूह नृृत्याविष्कार घडवून दाखविला. कल्याण येथील सम्राट अशोका आणि सिद्धार्थ हायस्कूलच्या विद्यार्थी विद्यार्थिंनीच्या लेझीम पथकाने वातावरणात आगळीच रंगत आणली. ढोल वाजविणारेही विद्यार्थी आणि लेझीम खेळणारेही विद्यार्थीच त्यांची कंम्पोझिशन्स त्याला लाभलेली वेशभूषेची जोड यामुळे रंगत वाढचत गेली.सम्राट अशोकाच्या दोन चिमुरड्यांनी सादर केलेला तानाजी मालुसुरेंचा कोंढाण्याचा पोवाडा धमाल गल्लीमध्ये वीरश्रीचे चैतन्य साकारून गेला. त्यानंतर या गल्लीचा समारोप झाला. कार्यक्रमाला मॅट्रो जक्शन मॉल, कल्याण आणि ब्रह्मांड आयुर्वेद यांनी सहाय केले.