Join us  

‘लोकमत लोकनेता सन्मान २०२४’ कॉफी टेबल बुक : आज प्रकाशन सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 8:30 AM

मुंबईतील राजकीय नेत्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा या कॉफी टेबल बुकमध्ये घेण्यात आला आहे.

मुंबई : ‘लोकमत लोकनेता सन्मान २०२४’ या कॉफी टेबल बुकचा प्रकाशन सोहळा आज, गुरुवारी दुपारी ४ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे. मुंबईतील राजकीय नेत्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा या कॉफी टेबल बुकमध्ये घेण्यात आला आहे.

लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

या सर्व मान्यवरांबरोबर राजकीय वाद-संवादाची मैफलही होणार आहे.  त्यांच्याबरोबर रंगणारी राजकीय जुगलबंदी एक वेगळा अनुभव देणारी ठरणार आहे. 

देशपातळीवर काम करणाऱ्या राजकीय नेत्यांना लोकमत संसदीय पुरस्काराने (पार्लमेंटरी अवॉर्ड) तर गावपातळीवर काम करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना लोकमत सरपंच अवॉर्डने दरवर्षी गौरवण्यात येते. याच शृंखलेत ‘लोकमत लोकनेता सन्मान २०२४ कॉफी टेबल बुक’चा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

नेत्यांची निवड

लोकसभा निवडणुकीत जिल्हा आणि तालुका पातळीवर उत्कृष्ट काम केलेल्यांच्या कार्याची दखल मतदारांनी मतदान करताना घेतली आहे. याच आधारावर लोकमतच्या निवड समितीने ‘लोकमत लोकनेता सन्मान’साठी नेत्यांची निवड केली आहे. कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून लोकनेत्यांच्या कार्याची छाप राज्यपातळीवर उमटावी. तसेच, येत्या काळात नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीमध्ये लोकनेत्यांना संधी मिळावी आणि त्यांच्या कार्याचा व्याप लाखो लोकांपर्यंत पोहोचावा, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

टॅग्स :मुंबईलोकमत इव्हेंट