Join us

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२२': रुग्णसेवेसाठी मुंबईतील कोणत्या डॉक्टरना द्याल पुरस्कार; पाहा नामांकनं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 3:36 PM

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा कृतज्ञ सन्मान म्हणजे, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा कृतज्ञ सन्मान म्हणजे, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार. लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यंदाचं या पुरस्कारांचं आठवं पुष्प. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. वैद्यकीय (डॉक्टर) मुंबई' या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे. तुमची मतं आणि मान्यवर ज्युरींनी दिलेले गुण याद्वारे पुरस्कार विजेत्याची निवड होईल. 

डॉ. फिरोज सुनावाला- मूत्ररोग तज्ज्ञ

 

किडनी प्रत्यारोपणासाठी ग्रामीण भागातील रुग्णांना मुंबईशिवाय पर्याय नसायचा. मात्र, डॉ. फिरोझ सुनावाला यांनी ३० वर्षांपूर्वी पुणे येथील रुबी हॉस्पिटल येथे किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ग्रामीण भागातून मुंबईत येण्यापेक्षा तेथेच या विकाराच्या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली. तसेच त्यानंतर पुणे रुग्णालयातही या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. मुंबईतही त्यांनी एशियन हार्ट इन्स्टिट्यूट, गोदरेज हॉस्पिटल आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र असलेल्या एसआरआरसीसी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा विशेष विभाग सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी आतापर्यंत ६००० हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केल्या असून, त्यांचे हे काम अविरतपणे सुरू आहे. त्याशिवाय ते फॅमिली प्लॅनिंग असोशिएशन ऑफ इंडिया या बिगर शासकीय संस्थेचे वैद्यकीय सल्लागार असून त्यांनी एका हजारापेक्षा अधिक पुरुषांची बिना टाक्यांची नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे. तसेच अनेक डॉक्टरांना त्यांनी बिना टाक्यांची नसबंदी शस्त्रक्रिया कशी करावी याचे प्रशिक्षणही दिलेले आहे. त्यांना १०० पेक्षा अधिक वेळा देश, विदेशातून मूत्ररोग या विषयावर बोलण्याकरिता वैद्यकीय परिषदांमध्ये आमंत्रित केले आहे. त्यांनी काही काळ किडनी प्रत्यारोपण शल्यचिकित्सक म्हणून लंडन येथे काम केले आहे. तर त्यांचे शल्यचिकित्सेचे शिक्षण केईएम रुग्णालयात झाले आहे. सध्या ते ब्रीच कॅण्डी रुग्णालयासोबत आणखी तीन रुग्णालयात सेवा देत आहेत.

मत देण्यासाठी इथे क्लिक करा

डॉ. जलील पारकर- क्ष्वसनविकारतज्ज्ञ

मुंबई महानगराला सुरक्षित ठेवणारी पोलीस यंत्रणा श्वसनविकारांपासून दूर राहावी, यासाठी डॉ. जलील पारकर गेल्या २२ वर्षांपासून मुंबई पोलिसांना मोफत सेवा प्रदान करत आहेत. त्याचप्रमाणे क्षयरोग निर्मूलनासाठी ते झटतात. मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये क्षयरोग निर्मूलनासाठी डॉ. पारकर गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय शिबिरे आयोजित करत आहेत. वांद्रे येथील लीलावतीसारख्या पंचतारांकित रुग्णालयात काम करत असताना डॉ. पारकर यांची गरीब रुग्णांप्रती असणारी सेवा गेली अनेक वर्षे कायम आहे. रुग्णसेवेबरोबरच चांगला वैद्यकीय विद्यार्थी घडावा यासाठीही ते सातत्याने प्रयत्नशील असतात. डॉ. पारकर लीलावती रुग्णालयात श्वसन विकार या पदव्युत्तर विषयातील डीएनबी अभ्यासक्रमाचे प्राध्यापक आहेत. आजपर्यंत त्यांनी या विषयातील ५० हून अधिक विद्यार्थी घडविले आहेत. त्याचप्रमाणे शासनाच्या सर जे. जे. रुग्णालयात मानद सेवा प्राध्यापक म्हणूनही डॉ. पारकर कार्यरत असून, तेथील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करत आहेत. या ठिकाणी त्यांनी क्षयरोग आणि आयव्ही ग्रस्त रुग्णांमधील क्षयरोग यावर मोठे काम उभारले आहे. सेलिब्रिटींचे डॉक्टर म्हणून वैद्यकीय विश्वात डॉ. पारकर यांची ख्याती आहे. राज्यातील विविध पक्षांतील सर्वच मोठे नेते त्यांच्याकडून वैद्यकीय उपचार घेत असतात. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण मुंबईत घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या क्लीव्हलँड शहरातील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल ऑफ क्लीव्हलँड या संस्थेतून श्वसन विकार विषयात फेलोशिप घेतली आहे.

मत देण्यासाठी इथे क्लिक करा

डॉ. मंदार नाडकर्णी- कर्करोग शल्यचिकित्सक

 

स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण भारतीय महिलांमध्ये आढळते. त्यात अनेकदा सर्जिकल कौशल्य वापरून स्तनांचे संवर्धन करून शस्त्रक्रिया करण्याची पद्धत डॉ. मंदार नाडकर्णी यांनी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केली. स्तनाचा कर्करोग बळावल्यावर स्तन काढावे लागतात. मात्र, प्लास्टिक सर्जरी करून कृत्रिमरीत्या स्तन तयार केले जातात. त्यामुळे स्तनाची शस्त्रक्रिया झाल्याचे कळूनही येत नाही. त्यामुळे महिलांचा आत्मविश्वास टीकून राहतो. त्यांनी कर्करोग शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण टाटा मेमोरियल रुग्णालयात घेऊन अनेक वर्षे त्याच रुग्णालयात सेवा बजावली. स्तनाच्या कर्करोगाच्या ६००० शस्त्रक्रिया त्यांनी केल्या. २००९ साली ते अंधेरीच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात रुजू झाले, आजतागायत तिथे डॉ. नाडकर्णी यांनी २५०० हून अधिक स्तनाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. या सर्जिकल कौशल्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या स्तनाच्या कर्करुग्णांपैकी ७० टक्के रुग्णांचे स्तन संवर्धन करून शस्त्रक्रिया केल्या आहेत. रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबातील जवळच्या सदस्यांचे समुपदेशन करून शस्त्रक्रिया समजावून सांगणारे डॉ. नाडकर्णी यांचे या शस्त्रक्रियावरील जागतिक दर्जाचे २१ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे संपूर्ण वैद्यकीय शिक्षण मुंबई झाले असून, स्तन कर्करोगाच्या प्लास्टिक शल्यचिकित्सेचे प्रशिक्षण त्यांनी फ्रान्स येथील प्रसिद्ध अशा सेंटर ऑस्कर लॅम्ब्रेट लिली या संस्थेतून घेतले आहे.

मत देण्यासाठी इथे क्लिक करा

डॉ. राहुल पंडित- इन्टेसिव्हिस्ट

सांगली जिल्ह्यात शालेय शिक्षण पूर्ण करणारे डॉ. राहुल पंडित क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट म्हणून वैद्यकीय विश्वात ओळखले जातात. ऑस्ट्रेलियात जाऊन त्यांनी क्रिटिकल केअर या वैद्यकीय क्षेत्रातील शाखेचे शिक्षण घेतले. काही काळ ऑस्ट्रेलियात काम केल्यानंतर ते मायदेशी परतले. गेल्या १२ वर्षांत डॉ. पंडित यांनी जगभरातील किमान १२० डॉक्टरांना क्रिटिकल केअर वैद्यकीय सेवेचे प्रशिक्षण दिले आहे. या शाखेत अधिकाधिक तज्ज्ञ डॉक्टरांची गरज आहे. फोर्टिस रुग्णालयात डॉ. पंडित यांनी प्रगत देशांच्या धर्तीवर अत्याधुनिक अतिदक्षता विभाग उभारला असून ऑस्ट्रेलियन कॉलेज ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन या संस्थेने त्यास मान्यता दिली आहे. त्यांच्या कारकीर्दीत मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या अंतर्गत ६६ टक्क्यांनी अवयवदान वाढल्याने डॉ. पंडित यांना राज्य अवयवदान कृती समितीत स्थान देण्यात आले. जवळपास दोन तपांची त्यांनी या क्षेत्रातील सेवा लक्षात घेत केंद्र सरकारने त्यांना सुप्रीम कोर्टाद्वारा स्थापित ऑक्सिजन टंचाईवरील समितीतही स्थान दिले. वैद्यकीय सेवा क्षेत्रात क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट तयार व्हावेत यासाठी डॉ. पंडित यांची कायम धडपड सुरू असते. त्यांनी लिहिलेल्या अनेक शोधनिबंधांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील त्यांची अनेक प्रकाशने जगभरात प्रसिद्ध झाली आहेत.

मत देण्यासाठी इथे क्लिक करा

डॉ. संजय अगरवाला- ऑर्थोपेडिक सर्जन

 

खुबा आणि गुडघा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर खाली बसू नये, भारतीय बनावटीच्या शौचालायत बसता येणे शक्य नाही असे उपाय डॉक्टरांकडून सुचविले जात होते. या काळात डॉ. संजय अगरवाला यांनी खुबा आणि गुडघा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेचे डिझाइन बदलून त्याच्या आधारे शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात करून प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर बिनधास्त रुग्ण खाली बसून नेहमीचे आयुष्य जगू शकतो हे दाखवून देऊन या पद्धतीच्या शकेडो शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. भारतात अशा पद्धतीच्या शस्त्रक्रियेची सुरुवात डॉ. अगरवाला यांनीच प्रथम केली. कोविडच्या काळात रुग्णांकडून स्टिरॉइड सेवन मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेक लोकांचा खुबा खराब होण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यावेळी अनेक नागरिकांना ए व्हॅस्क्युलर नेक्रोसिस ए वि एन, या खुब्याशी निगडित आजरात हाडांना मिळणार रक्ताचा प्रवाह थांबतो, त्यामुळे चालण्यास मोठ्या प्रमाणत त्रास होतो. त्यावेळी खुब्याचे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नसतो. या काळात डॉ. अगरवाला यांनी स्वत: शल्यचिकित्सक असूनसुद्धा बहुतांश या आजरांच्या रुग्णांना औषधोपचाराने बरे केले आहे, हे त्यांची संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. त्यासंदभार्तील त्यांचे १५ संशोधन पेपर जगभरात प्रसिद्ध केले आहेत. त्यांनी याकरिता स्वतंत्र औषधोपचारांची पद्धत तयार केली होती. त्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत आहे. डॉ. अगरवाला यांनी अस्थीरोगाशी संबंधित विविध देशांत जाऊन प्रशिक्षण घेतले आहे. सिने क्षेत्रातील अनेक कलावंत त्यांच्याकडे उपचारासाठी येतात.

मत देण्यासाठी इथे क्लिक करा

टॅग्स :लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2022डॉक्टर