Join us

LMOTY 2023: पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 7:18 PM

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी क्राईम नियंत्रणासाठी क्यूआर कोड तयार केले.

मुंबई: राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली होती. यातील आय. पी. एस. (प्रॉमिसिंग)या विभागात पाच जणांना नामांकन मिळाले होते. यंदा म्हणजेच २०२३ चा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचे मानकरी वर्ध्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन (Superintendent of Police Nurul Hasan) ठरले आहेत. 

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्याने मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. यामध्ये लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. या विभागात डॉ. हरी बालाजी एन-मुंबई, तेजस्वी सातपुते-मुंबई, विक्रम देशमाने-ठाणे ग्रामीण आणि सुहेल शर्मा-पुणे शहर यांनाही नॉमिनेशन देण्यात आले. 

पुरस्कार स्वीकारताना नुरुल हसन म्हणाले की, हा पुरस्कार शिस्तप्रिय जनतेला अर्पण करतो. महाराष्ट्रातील जनतेने प्रेम दिले, सहकार्य केले. शिस्तप्रिय महाराष्ट्रातील जनतेला धन्यवाद देतो. याशिवाय पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनाही पाठिंबा दिल्याबाबत धन्यवाद देतो. या पुरस्काराबाब लोकमतसचे आभार मानतो, असे ते म्हणाले. तसेच तरुणांसाठी त्यांनी एक शेरो-शायरी सादर करत मनोगताची सांगता केली.

पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी नागपूर येथे झोन १ मध्ये डीसीपी म्हणून रुजू झाले. तेथे १०० कोटी रुपयांचा मल्टी मार्केटिंग स्कॅम घोटाळा उघडकीस आणला. या कारवाईनंतर नुरुल हसन हे नाव महाराष्ट्राला माहीत झाले. कुख्यात गुंड आबू खान याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करून सतत सहा महिने पाठलाग करून त्यास अटक करत संपूर्ण गँगचा सफाया केला. दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी १०० गुन्हेगारांना तडीपार केले, ३० गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली. ४० गुन्हेगारांवर मोक्का कारवाई केली. त्यांची पोलिस अधीक्षक म्हणून वर्धा येथे पदोन्नती झाली. त्यांनी गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्का लावला. अवैध दारूविक्रीवर त्यांनी अंकुश लावला. सहा ते सात कोटींवर दारूसाठा त्यांनी जप्त करून पाच हजारांवर दारूविक्रेत्यांना अटक केली. 

बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. एमडी तस्करांना बेड्या ठोकल्या. नकली नोटा चलन करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. वाळू माफियांवर सर्वात मोठी कारवाई करून ७० ते ८० ट्रक जप्त केले. क्राईम नियंत्रणासाठी क्यूआर कोड तयार केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :लोकमतलोकमत इव्हेंट