Join us

LMOTY 2023: अन्नपूर्णा! डॉ. मेधा सामंत यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 6:33 PM

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: जिन्याखाली सुरू केलेले ऑफिस ते आता स्वतःची सहामजली इमारत हा डॉ. मेधा सामंत यांचा प्रवास थक्क करणारा तसेच प्रेरणादायी आहे.

मुंबई: राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली होती. यातील लोकसेवा-समाजसेवा विभागात पाच जणांना नामांकन मिळाले होते. यंदा म्हणजेच २०२३ चा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराच्या मानकरी डॉ. मेधा सामंत (Dr. Medha Samant) ठरल्या आहेत. 

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्याने मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. यामध्ये लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. लोकसेवा-समाजसेवा विभागासाठी दीपक नागरगोजे-बीड, हरखचंद सावला-मुंबई, खुशाल ढाक-नागपूर, डॉ. प्रसाद देवधर-सिंधुदुर्ग यांनाही या विभागात नामांकन मिळाले होते. 

पुरस्कार स्वीकारताना डॉ. मेधा सामंत म्हणाल्या की, लोकमतने दिलेला हा पुरस्कार अन्नपूर्णा परिवाराला अर्पण करत आहे.२० वर्षांपूर्वी १९९३ मध्ये बँक ऑफ इंडियामध्ये असलेली सुखवस्तू नोकरी सोडली आणि झोपडपट्टीतील महिलांसाठी काम करण्याचे आव्हान स्वीकारले. मी मूळची मुंबईकर आहे आणि आता पुणेकर आहे. झोपडपट्टीवासीयांसाठी वाहून घेतलेल्या कामाचे चीज झाले. कोणत्याही बँकांकडून या घटकांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य केले जात नाही. त्यामुळे या घटकासाठी काहीतरी करायचे ठरवले, अशा भावना मेधा सामंत यांनी व्यक्त केल्या.   

अन्नपूर्णा परिवाराच्या डॉ. मेधा सामंत यांनी आपले काम कर्वे रस्त्यावरच्या दशभुजा गणपतीसमोरच्या भाजीबाजारापासून सुरू केले. आता पुण्यातल्या सातशे झोपडयांत, तर मुंबईतल्या बाराशे झोपडयांत हे काम पोहोचले आहे. जिन्याखाली सुरू झालेले ऑफिस ते आता वारिजे परिसरात स्वत:ची १२ मजली इमारत असा संस्थेचा आजवरचा प्रवास आहे. मेधा सामंत यांनी झोपडपट्ट्यांमध्ये २० लाख महिलांना स्वत:च्या पायावर उभे केले आहे. पुणे आणि नवी मुंबई असे दोन ठिकाणी काम केले जाते. ६५० झोपडपट्ट्यांमध्ये काम सुरू आहे. 

आता २०० कोटींची महिलांच्या मालकीची कंपनी आहे. कंपनी नफ्यात सुरू असून, रिकव्हरी रेट १०० टक्के आहे. महिला सभासदांची संख्या अडीच लाख आहे. साडेतीनशे कर्मचारी संस्थेत काम करत आहेत. शहरांमधल्या झगमगाटामध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित राहतात. नेमक्या याच प्रश्नांना हात घालून मेधाताईंनी त्या लोकांना सन्मानाचे जगणे दिले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :लोकमतलोकमत इव्हेंट