Join us

LMOTY 2023: राज ठाकरे शॉक झाले, त्यांना वाटले योगी आदित्यनाथच आले... नेमके काय घडले? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 10:00 PM

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: लोकमत पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरे यांची मुलाखत सुरू असतानाच एक मजेशीर किस्सा घडला. नेमके काय झाले? जाणून घ्या...

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा दिमाखदार पुरस्कार सोहळा मुंबईत संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते, मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत. ही मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार आणि लोकप्रिय अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि बँकर, गायिका तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी घेतली. राजकारण, कुटुंब आणि सध्याची राजकीय परिस्थिती यावर आपल्या खास शैलीत उत्तरे दिली. मात्र, मुलाखत सुरू असताना राज ठाकरे एकदम शॉक झाले. 

चित्रपट हा राज ठाकरे यांचा लाडका आणि जिव्हाळ्याचा विषय. यासंदर्भात राज ठाकरे यांनी अनेकदा जाहीरपणे आपले मत मांडले आहे. मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत नाहीत तसेच आताच्या घडीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठी सिनेमांना स्थान दिले जात नाही. याबाबत राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आले. यावर बोलत असतानाच एक व्यक्ती प्रेक्षकांमध्ये आली आणि त्यांना पाहून राज ठाकरे एकदम थबलेच.

योगीजींवरचा प्रश्न आणि त्या व्यक्तीची एन्ट्री

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले असताना फिल्म सिटी उत्तर प्रदेशात नेण्याचा मनोदय बोलून दाखवला. परंतु, महाराष्ट्रतील परिस्थिती पाहिली, तर १४ जिल्हे आणि ११४ तालुक्यांमध्ये थिएटर स्क्रीन नाही. त्यामुळे बऱ्याचअंशी ही गोष्ट ओटीटीवर अवलंबून राहिली आहे आणि ते मराठी सिनेमे घेत नाहीत, यावर आपली भूमिका काय, असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देत असतानाच अचानक समोर प्रेक्षकांमध्ये नित्यानंद प्रभूजी यांचे आगमन झाले. नित्यानंद प्रभूजी यांना पाहताच राज ठाकरे थबकले आणि योगीजींचा विषय सुरू आहे आणि मला वाटले की योगीजीच (योगी आदित्यनाथ) आले की काय, असा सवाल केला. नाव काढावे आणि समोरून यावे, असे झाले, अशी मिश्लिक टिप्पणी राज ठाकरे यांनी नित्यानंद प्रभूजी यांना पाहून केली. 

दरम्यान, मराठी सिनेमांना स्क्रीन मिळवून दिल्यानंतर अनेकजण माझ्याकडे आले होते. मी त्यांना हेच सांगितले की, मी तुम्हाला स्क्रीन मिळवून देऊ शकतो, प्रेक्षक नाही. थिएटरबाबत बोलायचे झाले तर चांगला चालत असलेला सिनेमा थिएटर मालकाने काढला आहे, असे उदाहरण दाखवा. सिनेमा चालत नसेल, त्याला प्रेक्षक नसेल आणि व्यावसायिकदृष्ट्या थिएटर चालवणे जमत नसेल, तर तो सिनेमा स्क्रीनवरून काढेल. चांगला चालत असलेला, प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद असलेला सिनेमा काढला जाणार नाही. आपल्यासाठी कॉन्टेंट महत्त्वाचा आहे. तो तुम्ही देणे तितकेच महत्त्वाचे आहे. मी फिल्म काढली म्हणजे त्याला अमूक इतके दिवस स्क्रीन मिळाला पाहिजे, असे होऊ शकत नाही, असे रोखठोक उत्तर राज ठाकरे यांनी दिले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :राज ठाकरेलोकमतलोकमत इव्हेंटडॉ अमोल कोल्हेअमृता फडणवीस