Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करणारा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा आज मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे सुरू आहे. या सोहळ्यामध्ये भाजपाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गिरीज महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा विशेष पुरस्कार स्वीकारला.
भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले गिरीश महाजन हे जामनेर विधानसभा मतदारसंघातून १९९५ पासून २०१९ पर्यंत सलग सहा वेळा विजयी झाले आहेत. गिरीश महाजन यांनी भाजपामध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. पक्ष आणि सरकारसमोर येणाऱ्या अडीअडचणींप्रसंगी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने गिरीश महाजन यांना पक्षात संकटमोचक म्हणूनही ओळखलं जातं. २०१४ मध्ये राज्यात भाजपाची सत्ता आल्यावर गिरीश महाजन यांनी जलसंपदा खात्यासह, वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले होते. तर २०२२ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांच्याकडे ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राजकारण, समाजकारण, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, प्रशासन अशा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरव करण्यात येतो. ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’च्या इतिहासात आज पहिल्यांदाच हा समारंभ, भारताचे प्रवेशद्वार अशी ओळख असणाऱ्या गेटवे ऑफ इंडिया येथे होत आहे. या समारंभाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. कार्यक्रमाला राज्य सरकारमधील मंत्री, वरिष्ठ आयएएस आणि आयपीएस अधिकारी, उद्योजक, डॉक्टर्स, वकील उपस्थित आहेत.