“लोकमतने पुरस्कार दिला की ती व्यक्ती CM होते”; फडणवीस, शिंदेंसमोर विजय दर्डांनी सांगितले समीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 14:04 IST2025-03-20T13:58:38+5:302025-03-20T14:04:02+5:30
Lokmat Maharashtrian Of The Year Awards 2025: आधी लोकमतने एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरेंना पुरस्कार दिला आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले, असे विजय दर्डा यांनी म्हटले आहे.

“लोकमतने पुरस्कार दिला की ती व्यक्ती CM होते”; फडणवीस, शिंदेंसमोर विजय दर्डांनी सांगितले समीकरण
Lokmat Maharashtrian Of The Year Awards 2025: मुंबईत राजभवन येथे दिमाखदार पद्धतीने पार पडलेल्या लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार’ सोहळ्यात ‘मोस्ट पॉवरफुल पॉलिटिशियन’ या पुरस्काराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी पेनोंड रिकार्ड इंडियाचे नॅशनल हेड, कॉर्पोरेट अफेअर्स प्रसन्न मोहिले, लोकमत मीडिया समूहाच्या एडिटोरियल बोडांचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी तथा बँकर अमृता फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा आणि अभय भुतडा फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष अभय भुतडा उपस्थित होते. यावेळी या सोहळ्याचे प्रास्ताविक करताना डॉ. विजय दर्डा यांनी या पुरस्काराची पार्श्वभूमी आणि वाटचाल सविस्तरपणे मांडली.
डॉ. विजय दर्डा म्हणाले की, महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे कर्तृत्ववानांचा सन्मान लोकमतकडून केला जातो. दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याची आवर्जून वाट पाहिली जाते. सुमारे ५ हजार लोकमतचे प्रतिनिधी राज्यभरातील कानाकोपऱ्यात जाऊन कर्तृत्ववान माणसांचा शोध घेतात. यामुळे केवळ लोकशाही मजबूत होत नाही, तर आपापसातील संबंधही दृढ होतात. सोलापूरमधील एका छोट्याशा गावातून रणजीत डिसले नावाचे शिक्षक होते. त्या शिक्षकाचा शोध लोकमतने घेतला आणि त्यांचे काम सर्वांसमोर आणले. त्यांनाच आज जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. सरपंच पोपटराव पवार एका लहानश्या गावी वेगळ्या प्रकारे शेतीत प्रयोग करत होते. त्यांना आम्ही जनतेसमोर आणले. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. असे अनेक खेळाडू आहेत की, ज्यांना आम्ही समोर आणले. लोकमतचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला. अनेक खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खेळले. कॅन्सर रुग्णांसाठी काम करणारे डॉ. श्रीपाद बाणावली आणि ग्रामीण भागात आर्थिक सक्षमता येण्यासाठी काम करणाऱ्या चेतना सिन्हा या दोघांना २०१९ मध्ये लोकमत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते आता या पुरस्कारासाठीच्या ज्युरी मेंबरमध्ये होते.
लोकमतने पुरस्कार दिला की ती व्यक्ती CM होते
एकनाथ शिंदे यांना प्रथम लोकमतने पुरस्कार दिला आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे यांना आधी लोकमतने पुरस्कार दिला आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. याला अपवाद आमचे देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस यांना आधी पुरस्कार दिला असता, तर २०१४ च्या आधीच ते मुख्यमंत्री झाले असते. हा सिलसिला सुरू आहे आणि तो असाच पुढेही सुरू राहणार आहे, असे विजय दर्डा यांनी सांगितले. लोकमतचा हा पुरस्कार अंबानी परिवार, टाटा परिवार, लेन्सकार्टचे पीयूष बन्सल, कुमार मंगलम बिरला यांना यापूर्वी देण्यात आला आहे. यंदाचा पुरस्कार संजीव बजाज यांना देण्यात आला आहे. यंदा मुंबईचे विशेष पोलीस कमिश्नर देवेंद्र भारती यांना या पुरस्कारने सन्मानित करण्यात येत आहे, असे विजय दर्डा यांनी म्हटले आहे. प्रशासकीय सेवेबद्दल भूषण गगराणी यांना पुरस्कार दिला होता.
लोकमत पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीचीच निवड व्हावी
लोकमच्या लाखो वाचकांचाही यात सहभाग असतो. यात नॉमिनेशन झालेल्यांना लाखो मते मिळतात. त्यामुळे त्यांची लोकप्रियताही समोर येते. लोकमत पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीचीच निवड व्हावी, याकडे आम्ही कटाक्षाने लक्ष देतो. अनेक कलाकारांचा सन्मान लोकमत पुरस्कार देऊन आम्ही केला. कपूर ब्रदर्स असतील, रणवीर सिंह, रणवीर कपूर, आलिया भट, दीपिका पदुकोण अशी अनेक नावे सांगता येऊ शकतील. या सर्वांना आधी लोकमत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि त्यानंतर अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले, असे विजय दर्डा यांनी यावेळी बोलताना नमूद केले. तसेच श्रीदेवी यांनी ३५० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि या पुरस्कार सोहळ्याला राज्यपाल आणि मुख्यमंत्री दोघेही उपस्थित आहेत. श्रीदेवी यांना पद्मश्रीपेक्षा अधिक मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी अपेक्षा विजय दर्डा यांनी व्यक्त केली.
दरम्यान, यंदाच्या ज्युरी मेंबरमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल होते. ते या ज्युरी बोर्डाचे अध्यक्ष होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महाराष्ट्राच्या अतिरिक्त सचिव मनीषा म्हैसकर, नवी मुंबईचे पोलीस कमिश्नर मिलिंद भारंबे होते. युआयडीएफचे चेअरमन नीळकंठ मिश्रा होते. टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. श्रीपाद बाणावली होते. मुंबई हायकोर्टाचे वरिष्ठ अधिवक्ता अमित देसाई होते. पार्श्वगायिका श्रेया घोषाल होत्या. ड्रीम स्पोर्ट्सचे सीईओ हर्ष जैन होते. अभिनेते स्वप्नील जोशी होते. लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा होते, अशी माहिती विजय दर्डा यांनी दिली.