मुंबईः आपल्या आशयघन चित्रपटांनी मराठी सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'कासव' या चित्रपटाच्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि 'गुलाबजाम'इतक्या गोड आणि हळुवार अभिनयाने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना आज 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्कार विभागून देण्यात आला. चित्रपट (स्त्री) या विभागात परीक्षकांनी या दोघींची निवड केली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्काराचं हे पाचवं पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेलं मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो. महालक्ष्मीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये सुरू असलेल्या दिमाखदार सोहळ्यात सोनाली आणि सुमित्राताईंना सन्मानित करण्यात आलं.
सोनाली कुलकर्णी, गुलाबजाम, अभिनय
सोनाली कुलकर्णीने अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये बहुरंगी-बहुढंगी भूमिका साकारल्या आहेत. मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘दिल चाहता है’, ‘मिशन कश्मीर’, ‘सिंघम’ यांसारख्या चित्रपटांमधून तिनं आपल्या अभिनयाची छाप पाडली. ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘अगं बाई अरेच्चा २’, ‘देऊळ’, ‘पुणे ५२’ या मराठी चित्रपटातील तिच्या भूमिकांनाही प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. 'गुलाबजाम' या नव्या सिनेमातून एक वेगळी सोनाली चाहत्यांना भेटली आणि भावली.
मराठमोळे जेवण शिकण्यासाठी पुण्यात आलेल्या आदित्य आणि डबा बनवणाऱ्या, राधा यांची कथा प्रेक्षकांना ‘गुलाबजाम’ या चित्रपटात पाहायला मिळाली. राधा ही अतिशय अबोल, आपल्यात रमणारी असते. बाहेरच्या जगाशी तिचा संपर्क खूपच कमी असतो. राधाने आपल्याला जेवण बनवायला शिकवावे, अशी आदित्यची इच्छा असते, पण राधा या गोष्टीसाठी तयारच नसते, पण अनेक प्रयत्नाने आदित्य राधाला तयार करतो. राधाकडून जेवण शिकत असताना, राधा आणि आदित्य अधिकाधिक वेळ एकमेकांसोबत घालवायला लागतात आणि त्यांच्यात खूप छान मैत्री होते. त्या दोघांचाही एक भूतकाळ असतो. हा भूतकाळ ते सगळ्यांपासून लपवून ठेवत असतात, पण काही काळाने ते दोघेही आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एकमेकांसमोर मांडतात. आदित्य आणि राधाचे हे नाते कसे उलगडत जाते, हे खूप चांगल्या प्रकारे या चित्रपटात मांडण्यात आले आहे. अबोल, आपल्याच जगात रमणाऱ्या राधाची भूमिका सोनालीने छान साकारली आहे. तिच्या अभिनयाने चित्रपटाला चार चाँद लावले आहेत. या चित्रपटात सोनालीने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या हृदयास भिडली होती.
सुमित्रा भावे, कासव, दिग्दर्शक
१५ चित्रपट, ६०-७० लघुपट, पाच दूरदर्शन मालिका अशा अनेक कलाकृती आज सुमित्रा भावे यांच्या नावावर आहेत. ‘दोघी’, ‘जिंदगी जिंदाबाद’, ‘संहिता’, ‘अस्तु’, ‘कासव’ या सुमित्रा भावे यांच्या अजरामर कलाकृती आहेत. ६४व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘कासव’ या मराठी चित्रपटाने सुवर्णकमळ मिळविले आहे. सध्याच्या धकाधकीच्या दुनियेत आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. त्यामुळे आज अनेक जण डिप्रेशनचा सामना करत आहेत. याच डिप्रेशनवर आधारित ‘कासव’ या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात संवाद खूपच कमी आहेत, पण दिग्दर्शकाने कलाकारांच्या अभिनयातून प्रत्येक दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचविले आहे. ‘कासव’ या चित्रपटातील कलाकारांचे अभिनय, चित्रपटात टिपलेला कोकणचा परिसर, चित्रपटाची कथा या सगळ्यांचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले आहे. या चित्रपटात अलोक राजवाडे आणि इरावती हर्षे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात आलोकला खूपच कमी संवाद असले, तरी त्याने त्याच्या देहबोलीतून आणि अभिनयातून ही भूमिका ताकदीने रंगविली आहे. सुमित्रा भावे यांच्या दिग्दर्शनामुळेच कलाकारांना आपल्या भूमिका तितक्या ताकदीने साकारता आल्या आहेत.