LMOTY 2018 : 'आपला मानूस'साठी सुमित राघवनला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 06:32 PM2018-04-10T18:32:25+5:302018-04-10T18:32:25+5:30
छोटा पडदा, मोठा पडदा आणि आता वेब सीरीजमधूनही प्रेक्षकांच्या मनात घर केलेला अभिनेता सुमित राघवन याला 'आपला मानूस' या चित्रपटातील अभिनयासाठी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' पुरस्काराने गौरवण्यात आलं. अमेय वाघ (फास्टर फेणे), सचिन खेडेकर (बापजन्म), प्रसाद ओक (कच्चा लिंबू-दिग्दर्शन), ललित प्रभाकर (चि. व चि. सौ. कां) या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत सुमितनं बाजी मारली किशोरी शहाणे यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला.
मुंबई - छोटा पडदा, मोठा पडदा आणि आता वेब सीरीजमधूनही प्रेक्षकांच्या मनात घर केलेला अभिनेता सुमित राघवन याला 'आपला मानूस' या चित्रपटातील अभिनयासाठी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' पुरस्काराने गौरवण्यात आलं. अमेय वाघ (फास्टर फेणे), सचिन खेडेकर (बापजन्म), प्रसाद ओक (कच्चा लिंबू-दिग्दर्शन), ललित प्रभाकर (चि. व चि. सौ. कां) या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत सुमितनं बाजी मारली किशोरी शहाणे यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्काराचं हे पाचवं पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेलं मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो. वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये सुरू असलेल्या दिमाखदार सोहळ्यात सुमितला सन्मानित करण्यात आलं.
सुमित राघवनने ‘फास्टर फेणे’पासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. ‘हद कर दी आपने’, ‘तू तू मैं मैं’ या मालिकांमधूनही त्याचं दर्शन घडलं, पण ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेतील साहील या भूमिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘माय नेम इज खान’, ‘हॉलिडे’ यांसारख्या हिंदी चित्रपटातही सुमितने भूमिका साकारल्या आहेत.
‘आपला मानूस’ या चित्रपटात सुमित राघवनने राहुल ही भूमिका साकारली आहे. राहुलच्या वडिलांचा एक अपघात घडतो. या अपघाताची चौकशी करण्याची जबाबदारी क्राइम ऑफिसर नागरगोजेवर टाकली जाते. राहुल आणि त्याच्या पत्नीशी बोलून अपघाताच्या रात्री काय घडले होते, याविषयी जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतात. त्या दोघांची चौकशी केल्यानंतर, राहुलच्या बाबांनी आत्महत्या केली आहे किंवा राहुल, राहुलच्या पत्नीने त्यांचा खून केला आहे, अशा तीन निकषांवर नागरगोजे पोहोचतात. त्या रात्री राहुलच्या बाबांसोबत काय घडले, याचा शोध लावत असताना बाप-मूल आणि सुनेच्या नात्यातील गुंतागुंत क्राइम ऑफिसर नागरगोजे यांना कळते. त्यांच्या नात्यातील असलेला कडवटपणा क्राइम ऑफिसर नागरगोजे कसा दूर करतो, हे या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते. आजच्या पिढीला आपल्या पालकांसाठी वेळ नाहीये. उतारवयात पालकांना पैशापेक्षा आपल्या मुलाने दोन शब्द आपुलकीने बोलावे असे वाटत असते. त्यामुळे त्यांना वेळ द्या हा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. सुमितने या चित्रपटात रंगवलेली राहुल ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी चांगलेच कौतुक केले. त्याने त्याच्या अभिनयातून आणि देहबोलीतून राहुल ही व्यक्तिरेखा अक्षरश: जिवंत केली आहे.