लंडन महाराष्ट्र मंडळ ठरले 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'चे मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 06:22 PM2018-04-10T18:22:38+5:302018-04-10T18:22:38+5:30
भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पंधरा वर्षापूर्वीच थेट साहेबाच्या देशात मराठी झेंडा रोवणारं लंडन महाराष्ट्र मंडळ हे जगाच्या पाठीवरचं महाराष्ट्राबाहेरचं पहिलं महाराष्ट्र मंडळ.
मुंबई: स्वप्नांच्या शोधात लंडनमध्ये स्थलांतर केलेल्या मराठी लोकांना त्यांची मूळ ओळख जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लंडन महाराष्ट्र मंडळाला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2018' या पुरस्काराने गौरवण्यात आले. अभिनेता समीर धर्माधिकारी यांच्या हस्ते मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री.मुकुंद नवाथे यांनी हा सन्मान स्वीकारला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचं हे पाचवे पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेलं मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो. वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये सुरू असलेल्या दिमाखदार सोहळ्यात लंडन महाराष्ट्र मंडळाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तब्बल शहाऐंशी वर्षांपूर्वी लंडनमध्ये या मंडळाची स्थापना झाली. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पंधरा वर्षापूर्वीच थेट साहेबाच्या देशात मराठी झेंडा रोवणारं लंडन महाराष्ट्र मंडळ हे जगाच्या पाठीवरचं महाराष्ट्राबाहेरचं पहिलं महाराष्ट्र मंडळ. आज या मंडळाची लंडनमध्ये वास्तू आहे. सातत्याने चालणारे विविध कार्यक्रम लंडनमधल्या मराठी माणसांसाठी मोठा दिलासा असतो.