मुंबई: नाक, कान व घसा ही तीन इंद्रिये माणसाच्या जीवनात अतिशय गरजेचीच असतात. ही इंद्रियं सुस्थितीत असली की माणासाचं जगणं सुसह्य होतं. माणसांची हीच इंद्रियं शाबूत ठेवण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून करत असलेल्या डॉ. मिलिंद कीर्तने यांना आज 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचं हे पाचवं पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेलं मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो. महालक्ष्मीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये सुरू असलेल्या दिमाखदार सोहळ्यात डॉ. कीर्तने यांना सन्मानित करण्यात आलं. ईएनटी स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे डॉ. कीर्तने अतिशय मनमिळाऊ व लोकप्रिय डॉक्टर आहेत. त्यामुळेच मुंबई वा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देश-विदेशातील रुग्णही नाक, कान व घसा या तीन इंद्रियांवरील आजारांच्या उपचारांसाठी डॉ. कीर्तने यांच्याकडे धाव घेतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन त्यांना सन्मानित केले आहे. लहान मुलाला ऐकू येते की नाही, हा प्रश्न अनेकदा पडतो. त्या वयात मुलाला बोलता येत नाही, सांगता येत नाही आणि आपण जे बोलत असतो, ते कळतही नाही. अशा मुलांची तपासणी करून, त्यांना ऐकू यावे, यासाठी डॉ. कीर्तने यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत. त्यामुळेच मिळालेले सन्मान, सत्कार व पुरस्कार याहून, लहान मुलाला ऐकू येऊ लागते, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हास्य पाहायला त्यांना आवडते. हे हास्य हाच सन्मान आहे, असे त्यांना मनापासून वाटते. त्यासाठी ते ऑडिओलॉजिस्ट, स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट व त्या क्षेत्रातील प्रशिक्षक यांच्यामार्फत प्रचंड मेहनत घेतात.
डॉ. कीर्तने यांनी मुंबईच्या केईएम (जीएस मेडिकल कॉलेज)मधून एमएस केले आणि आज तिथे ते मानद प्राध्यापकही आहेत. याशिवाय मुंबईतील सैफी व हिंदुजा रुग्णालयात ते रुग्णांवर उपचार करतात. डॉ. कीर्तने यांची भारत सरकारने 2005 च्या बी. सी. रॉय पुरस्कारासाठी निवड केली. नॅशनल अॅकॅडमी ऑफ मेडिकल सायन्स तसेच सायन्स इंडोस्कोपिक सोसायटी ऑफ इंडिया, इंडियन सोसायटी ऑफ ऑक्टॉलॉजी, सोसायटी ऑफ लॅरिंगॉलॉजी यांच्याशी संबंध असलेल्या डॉ. कीर्तने यांनी असोसिएशन ऑफ ऑटोलॅरिंगॉलॉजिस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. ऑटोलॅरिंगॉलॉजी याचा आपल्या भाषेत अर्थ ईएनटी स्पेशालिस्ट वा नाक, कान, घशाचे डॉक्टर. पण ते केवळ ऑटोलॅरिंगॉलॉस्टि नसून, ऑटोहिनोलॅरिंगॉलॉजिस्ट म्हणजे सर्जनही आहेत. याखेरीज अनेक परदेशी वैद्यकीय संस्थांशी ते संबंधित आहेत. डॉ. कीर्तने यांनी केलेले लिखाण जसे प्रचंड आहे, तसेच त्यांच्यावरही अनेकांनी लिहिले आहे. डॉ. मिलिंद कीर्तने यांनी स्वत:ही अनेक डॉक्टर घडवले आहेत. हृदयात जसा पेसमेकर बसवतात, तसेच कर्णपटलाच्या मागे यंत्र बसवण्याची (इम्प्लांट) शस्त्रक्रिया डॉ. कीर्तने यांनी 20 वर्षांपूर्वी केली. त्यांनी आतापर्यंत केलेल्या विविध शस्त्रक्रियांची संख्या काही हजारांत असेल. इतका अभ्यास व वैशिष्ट्ये असलेले डॉ. कीर्तने यांचे स्वत:चे क्लिनिक आहे अमर भुवनमध्ये. ऑपेरा हाऊस चित्रपटगृहाजवळ, फ्रेंच ब्रिजपाशी. ते उघडते सकाळी सहा वाजता. बंद होण्याची वेळ मात्र ठरलेली नसते. जेव्हा शस्त्रक्रिया नसेल वा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना भेटायचे नसेल, तेव्हा ते तिथे हमखास भेटतात. चेहऱ्यावर हास्य आणि रुग्णांना नीट माहिती देऊन, त्यांची भीती कमी केली की बरेच प्रश्न सुटतात, यावर त्यांचा विश्वास आहे.