LMOTY 2018: धडाकेबाज धनंजय मुंडे ठरले 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'चे मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 05:00 PM2018-04-10T17:00:02+5:302018-04-11T09:52:09+5:30
नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी परळी मतदार संघात पंकजा यांचा पराभव करत, एकहाती मिळविलेल्या सत्तेमुळेही ते चर्चेत राहिले.
मुंबईः आपल्या आक्रमक आणि अभ्यासपूर्ण भाषणांनी विरोधकांना जेरीस आणणाऱ्या धनंजय मुंडे यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2018' या पुरस्काराने गौरवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनंजय मुंडे यांना 'पॉवरफुल्ल' राजकारण्यासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्काराचं हे पाचवं वर्षं आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेलं मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो. वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये सुरू असलेल्या दिमाखदार सोहळ्यात धनंजय मुंडे यांना मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
'मास लीडर' आणि फर्डे वक्तृत्व असणारा राजकारणी
बीड जिल्ह्यातील मुंडे घराण्याच्या रक्तातच नेतृत्व आणि राजकारणाचे बीज आहेत. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे ‘लोकनेते’ घरात असताना, धनंजय मुंडे राजकारणापासून दूर राहणे शक्यच नव्हते. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बीड जिल्ह्यात तरुणांचे संघटन करत, भाजपामध्ये तरुणांना सक्रिय करण्यासाठी ते कार्यरत झाले. गोपीनाथरावांच्या तालमीत राजकारणाचे धडे गिरवत असतानाच, जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडणूक लढविली. पुढे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले. जिल्हा परिषद, डी.सी.सी. बँक, वैद्यनाथ बँक, जगमित्र सूत गिरणी, अशा अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखविली. २०१२ मध्ये गोपीनाथराव मुंडे यांच्याशी राजकीय मतभेद झाल्याने, त्यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी ते विधान परिषदेचे सदस्य होते, पण सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पुन्हा विधानपरिषदेत सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून सध्या ते राजकारणात सक्रीय आहेत. अभ्यासपूर्ण आणि तडाखेबाज भाषणासाठी त्यांची ओळख आहे. एक आक्रमक राजकारणी म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. परळी मतदार संघात पंकजा मुंडे यांच्या विरोधात त्यांनी २०१४ची विधान सभा निवडणूक लढविली होती. नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी परळी मतदार संघात पंकजा यांचा पराभव करत, एकहाती मिळविलेल्या सत्तेमुळेही ते चर्चेत राहिले. विधानपरिषदेतील एक फर्डे वक्ते म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. या सगळ्यामुळेच भक्कम जनाधार असलेला नेता आणि सभागृहातील उत्तम लोकप्रतिनिधी अशी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले आहेत.