मुंबईः लाखो विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधीची कवाडे उघडी करून देणाऱ्या 'प्रॉक्टर अँड गॅम्बल' या सामाजिक संस्थेला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2018' या पुरस्काराने गौरवण्यात आले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचं हे पाचवं पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेलं मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो. वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये सुरू असलेल्या दिमाखदार सोहळ्यात 'प्रॉक्टर अँड गॅम्बल'च्या कामगिरीचा गौरव करण्यात आला.
उद्योजकतेबरोबर सामाजिक भान जपणारी संस्था
प्रॉक्टर अँड गॅम्बलच्या ' शिक्षा' या प्रकल्पाचे हे ८वे वर्ष आहे. आजवर २ लाख ८० हजार विद्यार्थ्यांना या प्रकल्पामुळे शिक्षणाची संधी मिळाली आहे. विविध एनजीओच्या मदतीने भारतात या प्रकल्पाच्याअंतर्गत १४० शाळांची उभ्या राहिल्या आहेत. स्थापनेपासून या प्रकल्पामधून २२ कोटी रुपयांच्या देणग्या देण्यात आल्या आहेत. भारतामध्ये सर्वांना 100 टक्के शिक्षण मिळावे असं फाऊंडेशनचं मूळ ध्येय आहे. या प्रकल्पाला अनुपम खेर, सुष्मिता सेन, सैफ अली खान, शर्मिला टागोर, आर. माधवन, अभय देओल, कोंकोणा सेन, तब्बू, सोहा अली खान, डॉ. किरण बेदी, जतीन दास अशा अनेक मान्यवरांनी मदत केलेली आहे.