मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांना आज 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर 2018 ' या पुरस्कार सोहळ्यात 'महाराष्ट्राचा अभिमान' या पुरस्काराने गौरविण्यात आलं. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर 2018 ' या पुरस्काराचे हे पाचवे पर्व आहे. महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंदीवार यांच्या हस्ते शास्त्री यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
एक माजी गुणवान अष्टपैलू खेळाडू म्हणून रवी शास्त्री यांची ख्याती क्रिकेट जगतात सर्वदूर पसरलेली आहेच. पण त्याचबरोबर त्यांनी समालोचक, भारतीय संघाचे संचालक आणि सध्याच्या घडीला मुख्य प्रशिक्षक ही पदे लीलया भूषवली आहेत. एका षटकात सहा षटकार लगावण्याच्या सर गॅरी सोबर्स यांच्या विक्रमाशी त्यांनी बरोबरी केली होती. त्याचबरोबर 1985-86 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या बेन्सन अँड हेजेस विश्व अजिंक्यपद स्पर्धेत शास्त्री यांनी देदीप्यमान कामगिरी केली होती. त्यामुळेच त्यांना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचबरोबर त्यांना ' ऑडी ' ही महागडी गाडीही भेट म्हणून देण्यात आली होती. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली खेळताना त्यांनी भारताचे उपकर्णधारपदही भूषवले होते. भारताचे 23वे कर्णधार होण्याचा मानही त्यांनी मिळवला होता. त्यांचा ' चपाती शॉट ' अजूनही क्रिकेट रसिकांच्या स्मरणात आहे.