मुंबई: 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर 2018' या पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना 'पॉलिटिशियन ऑफ द इयर' या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे, यतीन शहा आणि संजय राऊत यांच्या हस्ते पियुष गोयल यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचं हे पाचवं पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला.
राष्ट्रीय स्तरावरील राजकारणात पियुष गोयल यांनी आपला विशेष ठसा उमटवला आहे. केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याकडे महत्त्वाच्या अशा ऊर्जा खात्याची धुरा सोपवली. पियुष गोयल यांनी मोदींचा हा विश्वास सार्थ ठरवला. त्यांच्या कार्यकाळात देशातील अनेक दुर्गम भागांमध्ये वीज पोहोचवण्यात सरकार यशस्वी ठरले. या विश्वासातूनच मोदींनी त्यांच्याकडे रेल्वे खात्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविली. सुरेश प्रभू यांच्या कार्यक्षमतेमुळे या खात्याभोवती कधी नव्हे वलय निर्माण झाले होते. त्यामुळे साहजिकच प्रभूंच्या उत्तराधिकाऱ्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा होत्या. पियुष गोयल यांनी हे आव्हानदेखील सक्षमपणे पेलले. त्यामुळेच पियुष गोयल हे पंतप्रधान मोदींच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या याच कामाचा गौरव म्हणून 'लोकमत'ने त्यांना 'पॉलिटिशियन ऑफ द इयर'चा बहुमान दिला.