Join us

पर्यटन, पर्यावरण, शिक्षण; आदित्य ठाकरेंचं 'व्हीजन'; ऋषी दर्डांशी मनमोकळी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 8:44 PM

राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील तरुण-तडफदार मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा फोकस, उथळ राजकारणापेक्षा विकासकामांवर आहे, हे अनेकदा जाणवलं आहे.

सी-लिंक पासून बीडीडी पर्यंत सायकल वर जाता येईल... फ्लायओव्हरच्या खाली सुंदर ब्युटीफिकेशन केलेले असेल... बस स्टॉप देखील बसावे वाटणारे असतील... पवई लेक पूर्णपणे वेगळा सुंदर दिसेल... अशा एक ना दोन, अनेक कल्पना अतिशय उत्साहाने पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे मांडत होते. प्रत्येक विषय सांगताना त्यावर त्यांचा बारीक अभ्यास दिसत होता. तपशीलवार आकडेवारी सह ते माहिती देत होते. सकारात्मक विचाराने प्रेरित असणाऱ्या बड्या कार्पोरेट ऑफिसचा प्रमुख बोलतोय असंच चित्र होतं! वर्षा निवासस्थानी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि लोकमत मीडियाचे संपादकीय संचालक आणि सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांच्या भेटीदरम्यान मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाचा एक वेगळाच संवाद रंगला.

राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील तरुण-तडफदार मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा फोकस, उथळ राजकारणापेक्षा विकासकामांवर आहे, हे अनेकदा जाणवलं आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणी यापासून ते दोन हात दूरच आहेत. पर्यटन आणि पर्यावरण ही दोन महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आहेत. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी नवनवीन योजना, प्रकल्प, प्रयोग करण्यावर त्यांचा भर असतो. वर्षा निवासस्थानी झालेल्या भेटीतही त्यांच्या या 'व्हीजन'चा प्रत्यय आला. दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. त्यावेळी मुंबई व राज्यात पायाभूत सुविधा, पर्यटन आणि शैक्षणिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती आदित्य ठाकरे यांनी ऋषी दर्डा यांना दिली.

कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्र सावरतोय. हळूहळू 'अनलॉक' होतोय. त्यामुळे येत्या काळात विकासकामांना वेग येईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. पवई लेक सुशोभीकरण प्रकल्पाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. त्यासोबतच मुंबईच्या शाळांमध्ये सर्वांगीण सुधारणा करण्याचा मानसही आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवला. मुंबई महानगर पालिकेच्या शाळांचे एक वेगळेच चित्र आदित्य ठाकरे यांनी रेखाटले आहे. मुंबई महापालिकेच्या शाळेत जाताना अभिमान वाटावा अशा त्या शाळा असतील, अशी कल्पनाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

टॅग्स :आदित्य ठाकरेऋषी दर्डा