लग्न कराच, तो खूप आनंददायी सोहळा; रणवीरचा तरुणांना प्रेमाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 06:41 AM2018-12-20T06:41:04+5:302018-12-20T10:24:41+5:30

दीपिकासोबत लगीनगाठ बांधली गेल्यानंतर मला खूप सुरक्षित असल्यासारखं वाटतंय, स्थिरस्थावर झाल्यासारखं वाटतंय,

Lokmat Most Stylish Award 2018: Ranveer singh highly recommends youth to get marry afer his marriage with deepika padukone | लग्न कराच, तो खूप आनंददायी सोहळा; रणवीरचा तरुणांना प्रेमाचा सल्ला

लग्न कराच, तो खूप आनंददायी सोहळा; रणवीरचा तरुणांना प्रेमाचा सल्ला

मुंबईः मी हरखून गेलो होतो. वेगळ्याच विश्वात तरळत होतो. नोव्हेंबर हा माझ्यासाठी सगळ्यात आनंदी महिना होता, डोळ्यात आनंदाश्रू होते. त्यामुळे लग्न कराच अशी शिफारस मी सर्व तरुणांना करू इच्छितो, अशा भावना बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग यानं व्यक्त केल्या. 

दीपिकासोबत लगीनगाठ बांधली गेल्यानंतर मला खूप सुरक्षित असल्यासारखं वाटतंय, स्थिरस्थावर झाल्यासारखं वाटतंय, असंही रणवीरनं प्रांजळपणे सांगितलं. आता तिला पुढे ठेवून, तिच्या पावलावर पाऊल टाकत चालणार आहे. बायकोच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणायचं असतं, असं मी ऐकलंय. मी तसाच वागणार आहे, असं तो हसत-हसत म्हणाला.

'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड' सोहळ्यात मोस्ट स्टायलिश सुपरस्टार म्हणून रणवीरचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर लोकमत समूहाचे जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा यांनी रणवीरशी गप्पा मारल्या. तेव्हा, लग्नाबद्दल रणवीर मोकळेपणाने बोलला. लग्न आणि त्यानंतरची रिसेप्शन हा माझ्यासाठी सगळ्यात भारी क्षण होता. सगळ्यांसोबत सेलिब्रेट करताना मस्त वाटत होतं. त्यामुळे प्रत्येक तरुणानं आवर्जून लग्न करावं अशी मी शिफारस करतो, असं रणवीर म्हणाला.

इंटरनेट, स्मार्टफोन, टीव्ही या माध्यमांवर मनोरंजन उपलब्ध असल्यानं प्रेक्षक थिएटरकडे वळत नाहीत. त्यांना पुन्हा थिएटरकडे खेचण्याचा सर्वतोपरी प्रयत्न मला करायचा आहे. एखादा ट्रेलर पाहून, हा सिनेमा थिएटरमध्येच पाहायचा असं आपल्याला वाटतं. असे चित्रपट करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे, असं रणवीरने सांगितलं. रोज सिनेमाच्या सेटवर जाऊन काम करायला मिळतंय, यात मी खूप समाधानी आहे आणि त्यासाठी देवाचे आभार मानतो, असंही तो म्हणाला.


(PHOTO : Lokmat Most Stylish Awards 2018 : ‘सिम्बा’ आला अन् त्याने जिंकले!)

सेक्रेड गेम्स वर्ल्ड क्लास! 

'सेक्रेड गेम्स'चं या गाजलेल्या वेबसीरिजचं रणवीरनं भरभरून कौतुक केलं. या वेबसीरिजनं चाकोरी मोडण्याचं काम केलं आहे. जागतिक दर्जाची कलाकृती म्हणून आपण सेक्रेड गेम्सकडे बघू शकतो, अशी दाद रणवीरनं दिली. एखादा विषय मनाला भिडला, तर वेबसीरिज करायला मी तयार आहे; पण आत्ता तरी माझा फोकस प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्यावर असल्याचं त्यानं नमूद केलं. अक्षयकुमार हा अत्यंत उत्स्फूर्त अभिनेता असून त्याच्यासोबत काम करण्याची इच्छाही रणवीरनं बोलून दाखवली. 

रणवीरने धरला ठेका 

रणवीरचा 'सिंबा' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. सध्या त्याच्या प्रोमोची आणि सारा अली खानसोबतच्या रणवीरच्या ऑन स्क्रीन केमिस्ट्रीची जोरदार चर्चा आहे. ही जोडी लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डच्या स्टेजवर एकत्र आली आणि मग डान्सची फर्माइश झाली. त्यानंतर रणवीरनं सारा अली खान आणि सिद्धार्थ जाधवसोबत आँख मारे ओ लडकी आँख मारे या गाण्यावर ठेका धरला.

Web Title: Lokmat Most Stylish Award 2018: Ranveer singh highly recommends youth to get marry afer his marriage with deepika padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.