Lokmat Most Stylish Award 2018: शायना एन सी मोस्ट स्टायलिश राजकारणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 11:27 AM2018-12-20T11:27:19+5:302018-12-20T11:43:21+5:30
राजकारणी म्हटल्यावर डोळ्यापुढे जी प्रतिमा उभी राहते, त्या प्रतिमेला भाजपा नेत्या शायना एन. सी. यांनी छेद दिला आहे. त्यांचं दिसणं, राहणं, वावरणं, स्टाइल सगळंच एकदम हटके असतं.
मुंबई : राजकारणी म्हटल्यावर डोळ्यापुढे जी प्रतिमा उभी राहते, त्या प्रतिमेला भाजपा नेत्या शायना एन. सी. यांनी छेद दिला आहे. त्यांचं दिसणं, राहणं, वावरणं, स्टाइल सगळंच एकदम हटके असतं. त्याबद्दलच लोकमत मोस्ट स्टायलिश राजकारणी या पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं. मुंबईतील दिमाखदार सोहळ्यात शायना एन. सी. यांचा सन्मान करण्यात आला.
शायना नाना चुडासामा भाजपाच्या प्रवक्त्या आहेत. वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमध्ये त्या पक्षाची बाजू अगदी खंबीरपणे मांडतात. मात्र त्यांच्यात आणि इतर नेत्यांमध्ये फार मोठा फरक आहे. राजकारणी म्हटलं की राहणी अगदी साधी हवी, अशी मानसिकता असलेला एक मोठा वर्ग आहे. राजकारण्यांनी स्टायलिश असता कामा नये. त्यांनी अगदी सामान्य माणसांप्रमाणेच राहायला हवं, असं मानणारा एक मोठा मतप्रवाह भारतीय समाजात आहेत. मात्र शायना एन. सी. यांनी ही चौकट मोडून काढली आहे. फॅशन डिझायनर असलेल्या शायना यांचा उत्तम फॅशन सेन्स नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्यामुळेच लोकमत मोस्ट स्टायलिश राजकारणी पुरस्कारानं त्यांचा सन्मान करण्यात आला.
शायना यांचे वडील नाना चुडासामा मुंबईचे महापौर आणि शेरिफ राहिले आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानितदेखील करण्यात आलं आहे. शायना हाच वारसा सध्या पुढे नेत आहेत. भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून त्या कार्यरत आहेत. अनेक अडचणीच्या विषयांवर पक्षाची बाजू मांडण्याचं कसब त्यांच्याकडे आहेत. न्यूयॉर्कमधील फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आहे. सध्या त्या फॅशन डिझायनिंगसोबतच राजकारणातही सक्रीय आहेत.