लोकमत रियालिटी चेक : राज्यात सर्वत्र जुन्या दरानेच मास्कची विक्री होत असल्याचे धक्कादायक चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 05:31 AM2020-10-31T05:31:14+5:302020-10-31T05:31:20+5:30
Coronavirus News : राज्य सरकारने मास्कच्या दर नियंत्रणाचा निर्णय घेतला. मात्र सरकारचा हा निर्णय आणि दरपत्रक औषध विक्री दुकानदारांपर्यंत पोहोचलेच नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रियालिटी चेकमध्ये दिसून आले.
(आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींकडून)
मुंबई : कोरोनाचा विषाणूपासून बचाव करण्यासाठी सध्यातरी मास्क हेच एकमेव साधन उपलब्ध असून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत मास्क उपलब्ध व्हावेत म्हणून राज्य सरकारने मास्कच्या दर नियंत्रणाचा निर्णय घेतला. त्यानुसार कोणत्या प्रकारचा मास्क किती किमतीला विकण्यात यावा हे ठरवून देण्यात आले. मात्र सरकारचा हा निर्णय आणि दरपत्रक औषध विक्री दुकानदारांपर्यंत पोहोचलेच नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रियालिटी चेकमध्ये दिसून आले. शिवाय, एकाही दुकानदाराने मास्कच्या किमतीचा दरफलक दुकानावर लावलेला नसल्याचे आढळून आले. याचाच अर्थ सरकारने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी अन्न व औषध विभागाने केली नसल्याचे स्पष्ट होते.
मुंबई : नव्या दराविषयी सर्व जण अनभिज्ञ
स्नेहा मोरे । मुंबई : मास्कच्या किमतीविषयी सामान्य नागरिकही अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. मास्क खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना दरपत्रकाविषयी माहिती नसल्यामुळे एन-९५ मास्क हा तब्बल ६०, ७० वा अगदी १०० रुपये दरानेही खरेदी केला जात आहे. तर दुसरीकडे तीन-चार पदरी मास्क अवघ्या
५ रुपयांपर्यंत विकता येणारा मास्क हा १५-२० रुपयांमध्ये विकण्यात येत आहे. संपूर्ण मुंबईत कोणत्याही केमिस्टच्या दुकानांमध्ये मास्कविषयीचे दरपत्रक लावलेले नाही. एन ९५ मास्कचे दर ५० रुपयांच्या पुढे आहेत, शिवाय या मास्कचा दुकानांमध्ये प्रचंड तुटवडा आहे. सर्जिकल मास्क १५ ते ३० रुपये, पाच लेयरचा मास्क ३० रुपये असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. औषध विक्रेते वा खासगी रुग्णालय यांच्याकडे अतिरिक्त दर, मास्कचा साठा वा दर्जाविषयीच्या तक्रारी आल्यास तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाने सांगितले.
पुणे : सर्जिकल मास्क १० रुपयांना
प्रज्ञा केळकर । पुणे : येथे सर्जिकल मास्क १० रुपयांना, एन-९५ मास्क ६० रुपयांना, तर पाच लेयरचा मास्क ७० रुपयांना विकला जात आहे. कोणत्याही दुकानाबाहेर मास्कचे दर दाखवणारे पत्रक लावण्यात आलेले नाही. महापालिकेने सर्जिकल मास्क दीड रुपये दराने, तर एन-९५ मास्क ३० रुपयांना खरेदी केल्याचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले.
औरंगाबाद : नव्या दरानुसार मास्कचा पुरवठाच नाही
संतोष हिरेमठ। औरंगाबाद : सर्जिकल मास्कसाठी ५ ते १० रुपये, तर एन-९५ मास्कसाठी ४० ते ५० घेतले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने मॅग्नम एन-९५ एमएच कप मास्कची ४२ रुपये या दराने खरेदी केली आहे. नव्या निर्णयानुसार मास्कची किंमत ४९ रुपये आहे, तर तीन पदरी सर्जिकल २ रुपये या दराने खरेदी केली आहे, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात मास्कचा पुरवठा झाला नसल्याचे औषधी भांडारतर्फे सांगण्यात आले. मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हिमांशू गुप्ता म्हणाले, मास्कच्या किंमतीचा निर्णय आताच झालेला आहे. अद्याप नव्या दरानुसार मास्कचा पुरवठा झालेला नाही.
जळगाव : आधीचे मास्क कसे विकणार?
आनंद सुरवाडे । जळगाव : शहरात एन ९५ मास्क कुठे २५० कुठे १२५ तर कुठे १०० रुपये दराने विक्री होत आहेत. विक्री किंमत दर्शनी भागात लावणे बंधनकारक असताना एकाही दुकानाच्या बाहेर या किमती लावण्यात आलेल्या नाहीत़ आधीच्या मास्कबाबत काय करावे, असा प्रश्न केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी उपस्थित केला आहे़ खासगी डॉक्टरांनाही हे मास्क अतिरिक्त दरातच विकत घ्यावे लागल्याचे आएमएचे सचिव डॉ़ स्नेहल फेगडे यांनी सांगितले़
सांगली : एन ९५ मास्कचा तुटवडा
शरद जाधव। सांगली : सांगली शहरात एन ९५ व दोन पदरी, तीन पदरी मास्कच उपलब्ध नव्हते. मेडिकल्सची सर्वाधिक संख्या असलेल्या सिव्हील हॉस्पिटल चौकात एकाही दुकानात हे मास्क नव्हते. याशिवाय मेडिकल दुकानांमध्ये मास्कच्या दराबाबत कोणीही फलक लावलेले नाहीत. अधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटत चालली आहे. यापूर्वीच खरेदी करुन ठेवलेले मास्कचा वापर होत आहे. सांगली शहरात बहूतांश मेडिकलमध्ये एन ९५ मास्कचे सर्व प्रकार उपलब्ध नव्हते.
सोलापूर : दर कमी झाले, पण...
शीतलकुमार कांबळे। सोलापूर : सोलापुरात एन ९५ मास्क ५० रुपयाला, टू लेयर (रियुजेबल) मास्क २० रुपये तर थ्री लेयर मास्क चार रुपयाला एक मिळत आहे. बहुतांश औषध विक्री दुकानात मास्कचे सर्व प्रकार उपलब्ध नाहीत. फक्त एन ९५ आणि रियुजेबल कापडी मास्क विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाने दोन महिन्यांपूर्वी (शासनाने दर निश्चित करण्यापूर्वी) मास्क खरेदी केले होते. शासनाने ठरवलेल्या दराप्रमाणेच सर्वांनी मास्कची विक्री करावी, असे सोलापूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे पत्रक काढून सर्व औषध विक्रेत्यांना आवाहन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कोल्हापूर : स्वस्त मास्कचा आदेश कागदावरच
समीर देशपांडे । कोल्हापूर : कोल्हापुरात स्वस्त मास्कचा आदेश कागदावरच आहे. नागरिक कापडी मास्कना प्राधान्य देत आहेत. तर औषध दुकानांमध्ये वाट्टेल त्या किमती सांगितल्या जात आहेत. एन ९५ मास्कच्या किमती ५० रूपयांपासून १०० रूपयांपर्यंत आहेत. तर साधे मास्कही १० आणि १५ रूपयांना विकले जात आहेत. कोणत्याही दुकानांसमोर फलक लावलेले नाहीत. जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत जिल्हा परिषदेनेच सर्व खरेदी केली आहे. नवीन शासन आदेश आल्यानंतर मास्कची खरेदी झाली नसल्याचे सांगण्यात आले.
नागपूर : जादा दराने विक्री
सुमेध वाघमारे। नागपूर : ४९ रुपयांपर्यंत मिळणारे एन ९५ मास्क हे १०० ते १५० रुपयांत विक्री होत आहेत. दुपदरी आणि तीनपदरी ३ ते ४ रुपयांत विक्रीचे आदेश असताना तीन पदरी ८ ते १२ रुपये तर दोन पदरी ५ ते ६ रुपयांत विक्री होत आहे.
अकोला : सरकारच्या निर्णयाची कल्पनाच नाही
प्रवीण खेते । अकोला : शहरातील अनेक औषध व्यावसायिकांना याची कल्पनाच नसल्याचे आढळून आले. शहरातील मोजके ४ ते ५ औषध दुकाने वगळता असा काही निर्णय झाला आहे, याची कल्पनाच नाही. त्यामुळे दोन व तीन पदरी असलेले मास्क १० रुपयांपासून विक्री होत असल्याचे दिसून आले. एन ९५ मास्क काही मोजक्याच औषधी दुकानावर दिसून आले. त्याचे दरसुध्दा काही दुकानदार ८० रुपये घेत असल्याचे स्पष्ट झाले. कोणत्याच दुकानासमोर मास्कचे दर लावल्याचे फलकसुद्धा आढळून आले नाहीत.
नाशिक : नवे मास्क आलेच नाही
धनंजय रिसोडकर । नाशिक : ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा अधिक दराने मास्क विक्री होत आहे. विचारणा करणाऱ्ताांना काहीशी सवलत देऊन त्यांची बोळवण केली जाते. दोन पदरी व तीन पदरी कापडी मास्क ३० ते ८० रुपयांपर्यंत विकले जात आहेत. शासनाने ठरवून दिलेले मास्क अद्याप विक्रीसाठी आलेच नसल्याचे सांगण्यात आले.
अधिकारी काय म्हणतात..?
राज्य शासनाच्या दरानुसारच मास्कची खरेदी करण्यात येते. यात एन-९५ मास्क २५ रुपयांना, तर तीन पदरी मास्क चार रुपये दराने खरेदी करण्यात येतो. याखेरीज, खासगी रुग्णालयांना मास्कच्या दरांविषयीचे परिपत्रक पाठवून तातडीच्या अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त
आयुक्त, मुंबई महापालिका
केमिस्ट संघटनेशी चर्चा करुन नवीन दराने मास्कची विक्री करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक दुकानात मास्कचे दरपत्रक दर्शनी भागात लावण्याच्याही सूचना देण्यात आल्या
आहेत.
- नितीन भांडारकर, सहायक आयुक्त , एफडीए, सांगली
शासनाच्या आदेशाप्रमाणे औषध विक्रेत्यांना ठरलेल्या दराप्रमाणेच मास्कची विक्री करण्यास सांगितले आहे. तसेच औषध दुकानांची तपासणा करण्यात येत आहे.
- नामदेव भालेराव, सहायक आयुक्त, एफडीए, कोल्हापूर
मास्कच्या किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या किंमतीवर कोणी मास्क विक्री करीत असेल तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल.
- डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा शल्यचिकित्सक, नागपूर
खाजगी रुग्णालयांना शासनाचे पत्र पाठवले जाणार आहे. तेवढेच दर आकारण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच औषध विक्रेत्यांनी मास्कची विक्री करणे बंधनकारक आहे. मास्क जादा दराने विकल्यास मेडिकल स्टोअरना नोटिसा पाठवल्या जातील.
- डॉ. आशिष भारती,
मनपा आरोग्य विभाग प्रमुख, पुणे
मास्क दरांबाबत आपण जनजागृती केली असून फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत़ यात तपासणी करून काही दुकानांवर स्वत: बोर्ड लावले़ ज्याची किंमत शासनाने नियंत्रण केलेली ते मास्क जळगावात कुठेही दिसून आलेले नाही़ अन्य मास्कच्या किमतीवर प्रशासनाचे नियंत्रण नाही़ जेवढे शासनाच्या यादीत मास्क आहेत त्यांच्यावर प्रशासनाचे नियंत्रण आहे़.
- अनिल माणिकराव,
औषध निरीक्षक, एफडीए, जळगाव
जिल्ह्यात महिन्याभरात कोरोना रूग्णांची संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे आधी खरेदी केलेल्या मास्कचा उपयोग सुरू आहे. यापुढची खरेदी शासन आदेशानुसार करणे बंधनकारक आहे.
- डॉ. योगेश साळे,
जिल्हा आरोग्य अधिकारी, कोल्हापूर