मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि ‘लोकमत’ संखी मंच यांच्या वतीने शनिवारी, ११ मार्च रोजी महिलांसाठी आरोग्यविषयक ‘फिटनेस फंडा’ यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच अभिनेता सुबोध भावे आणि आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकर हे यावेळी उपस्थित महिलांशी संवाद साधणार आहेत.
आरोग्यविषयक या कार्यक्रमात लीलावती रुग्णालयातील प्रसिद्ध स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. नंदिता पालशेतकर या महिलांच्या आरोग्यावर बोलणार असून, महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. त्यासोबतच सेलिब्रिटी फिटनेस एक्स्पर्ट लीना मोगरे या महिलांना सध्याच्या धकाधकीच्या जीवनात बदलत्या जीवनशैलीबद्दल टिप्स देणार आहेत. व्यायामाचे महत्त्व या विषयावर त्या महिलांशी संवाद साधतील. आरोग्यासोबत मनोरंजन, असा हा आगळावेगळा कार्यक्रम असेल.
कार्यक्रमास पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे तसेच मेयर ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका उमा कालेकर उपस्थित राहणार आहेत. विषेश म्हणजे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमादरम्यान ‘लोकमत सखी मंच’च्या सभासदांसाठी विविध प्रांतीय नववधू वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे प्रदान केली जाणार आहेत. हा कार्यक्रम केवळ ‘लोकमत सखी मंच’ सभासदांसाठी आहे, याची नोंद घ्यावी.