लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : समाजात घडणाऱ्या घटनांची स्पंदने संवेदनशीलपणे टिपत साहित्याच्या माध्यमातून त्यावर आपल्या विचारांची मोहोर उमटविणाऱ्या साहित्यिकांचा ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यासाठी साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची समिती नेमण्यात आली होती. त्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून, विजेत्यांची नावे येत्या रविवारच्या ‘लोकमत’मध्ये जाहीर केली जातील.
‘लोकमत’ने महाराष्ट्रभरातील १५ तज्ज्ञ लोकांची समिती नेमली होती. २०२२ वर्षातील उत्तम पुस्तकांची शिफारस या समितीने केली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने त्या शिफारशींसह विविध पुस्तकांवर विचार मंथन केले. हे या पुरस्काराचे चौथे वर्ष आहे. ‘लोकमत’ साहित्य राज्यस्तरीय पुरस्काराकरिता कादंबरी, कथा, कविता, ललित, अनुवाद, आत्मकथन, बालसाहित्य, चित्रपटविषयक लेखन, लक्षणीय, वैचारिक, पुस्तकाची उत्कृष्ट मांडणी व मुखपृष्ठ अशा विविध प्रकारांना विचारात घेत उत्कृष्ट पुस्तकांची निवड करण्यात आली. या पुरस्कारांच्या निमित्ताने वाचकांना समृद्ध करणारे लेखक, कवी, पुस्तके यांना ग्लॅमर मिळवून देणारे नवे व्यासपीठ खुले हाेणार आहे.
ज्युरी मंडळ
भारत सासणे (ज्येष्ठ साहित्यिक, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय साहित्य संमेलन), विजय बाविस्कर (समूह संपादक, लोकमत), वैभव मांगले (लेखक व अभिनेता), आसाराम लोमटे (ज्येष्ठ साहित्यिक), अपर्णा पाडगावकर (लेखिका व सिने-मालिका निर्मात्या), किरण येले (कवी) अतुल कुलकर्णी (संपादक, लोकमत, मुंबई).
ठाणे येथे रंगणार सोहळा
‘लोकमत’ साहित्य पुरस्कारांचे आयोजन येत्या २३ मार्च २०२३ रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे सायंकाळी ४.४५ वाजता करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी साहित्यिकांची मांदियाळी तिथे अवतरणार आहे. नाट्य, मालिका, सिनेमा तसेच कला क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"