Join us

लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार: ताल सुरांच्या वर्षावात रमले संगीतप्रेमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 12:20 AM

कोरोनामुळे प्रत्यक्ष कार्यक्रमापासून मुकलेल्या संगीतप्रेमींना 'लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारा'च्या सोहळ्यात ताल-सुरांच्या आतषबाजीची कसर भरून काढण्याची संधी मिळाली.

मुंबई : संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणाऱ्या 'सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार' सोहळ्याच्या उत्तर रंगात गाण्याची मैफल झाली. या मैफलीची सुरुवात झाली ती एस. आकाश, शिखर नाद कुरेशी, ओजस अढिया आणि रमाकांत गायकवाड यांच्या वादन जुगलबंदीने. पाठोपाठ गायिका पूजा गायतोंडे यांनी 'भर दो झोली मेरी' ही कव्वाली मोठ्या नजाकतीत पेश केली. गायिका अंकिता जोशी यांनी 'गोविंद गोपाळ' हे गीत तन्मयतेने सादर केले. गायिका आर्या आंबेकर यांनी 'म्हारो प्रणाम' आणि 'अवघा रंग एक' ही गीते सादर करून रसिकांची दाद मिळवली.

यंदाचे लोकमतसूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार विजेते प्रथमेश लघाटे यांनी पं. भीमसेन जोशी यांना आदरांजली म्हणून 'सावळे सुंदर' हे भजन सादर केले. या भजनाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. पुरस्कार विजेत्या गायिका हरगुन कौर यांच्या 'आई भवानी तारसी भक्ताला' या गीताने सोहळ्याची सांगता झाली.  या अनोख्या संगीत मेजवानीमुळे ही सायंकाळ कायम रसिकांच्या स्मरणात राहील.

सिद्धेश बिचोलकर (हार्मोनियम), सुखद मुंडे (पखवाज), सूर्यकांत सुर्वे, (टाळ, मंजिरा), दीपक भट (ढोल), रत्नदीप जामसांडेकर (ढोलकी) , नितेश सोनावणे (कीबोर्ड), विवेक राजगोपालन (मृदुंग), प्रसाद पाध्ये (तबला), मोहम्मद शादाब (ढोलक), शहनवाज अहमद (गिटार), संदीप मिश्रा (सारंगी) या कलाकारांनी वादन साथ केली. तर, विशाल जगताप, आदित्य नीला आणि आदिती गोसावी यांनी गायन साथ केली.

टॅग्स :सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारलोकमत