मुंबई : रुग्णांसाठी अविरतपणे झटणाऱ्या मुंबईतील निवडक वैद्यकीय तज्ज्ञांचा सन्मान ‘लोकमत समूहा’च्या वतीने करण्यात येणार आहे. ‘लोकमत वेलनेस आयकॉन २०१९’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत रंगणार आहे. या सोहळ्याचे हे पहिलेच वर्ष आहे. या सोहळ्याला राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हा पुरस्कार सोहळा सिमंधर हर्बल प्रा. लि. आणि श्री धूतपापेश्वर लि. यांच्या सहकार्याने पार पडणार आहे. पहिल्यांदाच वैद्यकीय तज्ज्ञांसाठी अशा स्वरूपाचा विशेष पुरस्कार सोहळा होत असून या सोहळ्यात आरोग्य सेवा क्षेत्रातील विविध तज्ज्ञांची उपस्थिती असणार आहे. ‘लोकमत वेलनेस आयकॉन’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यात आरोग्यसेवा क्षेत्रातील नामांकित ३१ वैद्यकीय तज्ज्ञांना ‘लोकमत वेलनेस आयकॉन पुरस्कार २०१९’ने गौरविण्यात येणार आहे
त्याचप्रमाणे ‘अजूनही वैद्यकीय क्षेत्राची विश्वासार्हता टिकून आहे का?’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, परिवर्तन-द टर्निंग पॉइंट संस्थेचे ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे, टाटा मेमोरिअलच्या मेडिसिन आणि पीडीएट्रीक आॅन्कोलॉजी विभागप्रमुख डॉ. श्रीपाद बाणावली, कॉलेज आॅफ फिजिशिअन्स अॅण्ड सर्जन्सचे डॉ. गिरीश मैंदारकर, द योगा इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. हंसा योगेंद्र, प्रसिद्ध अभिनेत्री डॉ. आदिती गोवित्रीकर, बॉम्बे रुग्णालयाचे फिजिशिअन डॉ. गौतम भन्साळी, अभिनेता देवदत्त नागे आदी प्रमुख मान्यवर यात सहभागी होणार आहेत. हा सोहळा केवळ निमंत्रितांसाठी आहे.