लोकमत वुमेन समीट : महिलाही हिरोच; ही परिवर्तनाची नांदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 03:02 AM2019-07-24T03:02:08+5:302019-07-24T06:57:25+5:30
ठमाताई पवार यांना मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव, सुमित्रा भावे यांना ज्योत्स्ना दर्डा कार्यगौरव पुरस्कार प्रदान
पुणे : मला केवळ हिरो व्हायचे आहे. हो ‘हिरो’च! कारण, हिरोला जेंडर नसते. हिरो म्हणजे आपला आदर्श. हा आदर्श स्त्रीही असू शकते. कालानुरुप संकल्पना बदलत असताना हिरो या संज्ञेतही बदल व्हायला हवेत. आज अनेक चित्रपटांच्या हिरो अभिनेत्रीच आहेत. ही परिवर्तनाची नांदीच आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूने ‘लिव्ह टू लीड’ ही संकल्पना अधोरेखित केली.
लोकमत वुमन समीटच्या आठव्या पर्वामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू बोलत होती. लोकमत उमंग पुरस्कार देऊन तापसीला गौरविण्यात आले. या वेळी ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, लेक्सिकन स्कूल्सच्या संचालक मोनिषा शर्मा, लोकमतचे संपादक प्रशांत दीक्षित उपस्थित होते. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते.
लोकमत वुमेन समीटचे शानदार उद्घाटन झाले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोºहे, राज्य महिला आयोग आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे उपस्थित होत्या. आदिवासींसाठी काम
करणाऱ्या ठमाताई पवार यांना वीणादेवी दर्डा जीवनगौरव, ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना ज्योत्स्ना दर्डा कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रासाठी डॉ. भारती पाटील (कोल्हापूर), सांस्कृतिक - धनश्री खरवंडीकर (अहमदनगर), सामाजिक - सृष्टी सोनवणे (बीड), आरोग्य - डॉ. संजीवनी केळकर (सोलापूर), व्यावसायिक - सुप्रिया बडवे (औरंगाबाद), शौर्य - रुपाली मेश्राम (भंडारा) यांना गौरविण्यात आले.
आदिवासी पाड्यातील स्थिती पाहिली, तर महिलांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक आहे. घरातली कर्ती बाईच अशी असेल, तर मुलांवर काय संस्कार होणार? तिच्या आरोग्यावरही परिणाम होणारच. यासाठी गावातील लोकांच्या पाठीवर मायेचा हात ठेवला. गावात भजनी मंडळे सुरू केली. दिंड्या काढल्या आणि ही व्यसनाधीनता दूर करण्याचा प्रयत्न केला. आज जो समाज भरकटलेला आहे, तो मुख्य प्रवाहात यावा अशी इच्छा आहे, त्यादृष्टीनेच प्रयत्न सुरू असून, शिक्षणानेच ही गोष्ट साध्य होणार आहे. - ठमाताई पवार
या समीटची संकल्पना ‘लिव्ह टू लीड’ अशी आहे; पण सध्याचे जागतिक प्रश्न बघता महिलांनी ‘लीड टू लिव्ह’ म्हणायला हरकत नसावी. स्त्रीने नेतृत्वात पुढाकार घ्यायला हवा, असे म्हणत असताना इथे स्त्री-पुरुष यांच्यातला शारीरिक भेद अभिप्रेत नाही. मार्दव, सेवा, स्वत:च्या आधी दुसºयाच्या सुखाचा विचार हे मातृत्वाचे गुणं म्हणजेच स्त्रीत्व! आणि निर्भयता, बुद्धिनिष्ठ, विस्तारित विचार, विज्ञानाची ओढ हे पौरुषाचे गुण म्हणता येतील. या दोन्ही गुणांची बेरीज झाल्याखेरीज समाजातील विषमता जाऊन निर्भेळ न्यायाचे, स्वातंत्र्याचे, समतेचे आणि बंधुतेचे म्हणजे मैत्रीचे वातावरण तयार होणार नाही. - सुमित्रा भावे
‘संघर्ष प्रत्येकालाच करावा लागतो. विशेषत: प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा प्रयत्न केला, तर जास्त विरोध होतो. विरोध झाला तरी हरू नका, निराश होऊ नका. कारण, पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्याची धुरा महिलांच्या हातात आहे. चित्रपटसृष्टीतील चित्रही बदलत आहेत. महिन्यातून किमान दोन नायिकाप्रधान चित्रपट प्रदर्शित होतात. महिला प्रॉडक्शन हाऊसची जबाबदारीही सांभाळत आहेत. -तापसी पन्नू
अभिनेत्री तापसी पन्नूचा विश्वास : एनईसीसी व लेक्सिकन स्कूल्सच्या सहयोगाने परिषदमी इंदिराजींना पाहिले आहे आणि आता निर्मला सीतारामन यांची वाटचालही पाहत आहे. या महिलांकडे नेतृत्व आले आणि त्या ते मनापासून जगल्या. महिलांच्या हाती नेतृत्व गेले की, पुरुषांना अवघडल्यासारखे होते. महिला झोकून देऊन प्रामाणिकपणे काम करतात आणि ध्येयपूर्तीकडे जातात. महिला आपल्या कामातून तारा बनू पाहत आहेत. कामात अडचणी येणारच; मात्र त्या मात करू शकतात. बरेचदा महिलांना महिलांकडूनच अडचणी निर्माण होतात. हे चित्र बदलायला हवे. - विजय दर्डा, अध्यक्ष, लोकमत एडिटोरिअल बोर्ड
लहानपणापासूनच महिलांना तीन शब्द ऐकावे लागतात, ते म्हणजे ‘तू गप्प बस’. अनेकदा त्यांना वगळण्याचे राजकारणच केले जाते. कालपरत्वे यात बदल झाले असून, महिलांच्या कार्यकर्तृत्वाला रुपेरी किनार लाभली आहे. तरीही ‘आहे मनोहर तरी, गमते मज उदास’ अशी स्थिती अजूनही आहे. ती बदलायला हवी . -डॉ नीलम गोºहे,
विधानपरिषद उपसभापती
आपण फक्त ३३ टक्के आरक्षणाच्या चर्चा करतो; पण ते नसतानाही ७८ महिला खासदार झाल्या आहेत. १९ राज्यांत महिलांचे मतदान जास्त आहे. याचा अर्थ त्या कुणाला निवडून द्यायचे हे ठरवणार. आता देश बदलत आहे. गरीब महिलांना पुढे आणण्याची गरज आहे. लोकमत वुमन समीट वैचारिक दिशा देत आहे. - विजया रहाटकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग
महिलांना बिचारी म्हणू नका, ती पुरुषावर देखील भारी पडू शकते. त्यामुळे स्वत:ला कधीही कमजोर समजू नका. पेन आणि तलवारीपेक्षाही अधिक शक्ती ही नारीत आहे. त्यातूनच परिवर्तन घडू शकेल. आज महिला सर्व क्षेत्रांत नेतृत्व करीत आहेत. लोकसभेत ७८ महिला निवडून आल्या आहेत. - उषा काकडे, अध्यक्षा , ग्रॅव्हिटियस फाऊंडेशन