मुंबई - नाट्यक्षेत्र हे मनोरंजनाचे माध्यम असले तरी नाटकांच्या माध्यमातून प्रबोधन आणि सामाजिक संदेश देण्याचे कामही होत असते. जिद्द, चिकाटीच्या जोरावर झेप घेणाऱ्या मुलीची गोष्ट 'अनन्या' या नाटकातून दाखवण्यात आलीय. ही अनन्या अत्यंत ताकदीने साकारणारी संवेदशनील अभिनेत्री ऋतुजा बागवे हिला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर २०१८' पुरस्काराने गौरवण्यात आलं.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्काराचं हे पाचवं पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेलं मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो. महालक्ष्मीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये सुरू असलेल्या दिमाखदार सोहळ्यात ऋतुजा बागवे हिला सन्मानित करण्यात आलं.
कलावंताचा चांगल्या भूमिकांचा शोध कधी संपत नाही. एखादी ‘माइलस्टोन’ अशी भूमिका साकारायला मिळावी, असे त्याचे स्वप्न असते. काहींच्या बाबतीत हे स्वप्न सत्यात उतरते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, ऋतुजा बागवे हिची ‘अनन्या’ या नाटकातील भूमिका आहे. नाटकात अतिशय महत्त्वाकांक्षी दाखविलेल्या मुलीच्या जीवनात अचानक एक वादळ येते आणि तिचे भवितव्य पणाला लागते. आधी वैफल्यग्रस्त झालेल्या या मुलीच्या मनात एका क्षणी जिद्दीची ज्योत प्रज्वलित होते आणि तिच्यात होणारा हा सगळा बदल ऋतुजा बागवे हिने मोठ्या हिंमतीने नाटकात उभा केला आहे. या भूमिकेसाठी तिने काही दिवस विशेष प्रशिक्षणही घेतले आणि त्यातून ही ‘अनन्या’ रंगभूमीवर साकार झाली आहे.