ठाणे : निम्मा महाराष्ट्र यंदा दुष्काळाने होरपळला. तशी परिस्थिती पुन्हा उद््भवू द्यायची नसेल, तर पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे गरजेचे आहे. ती जाणीव निर्माण व्हावी, यासाठी ‘लोकमत’च्या छायाचित्रकारांनी राज्याच्या विविध भागांतून टिपलेल्या दुष्काळाच्या दाहकतेच्या छायाचित्रांचे प्रदर्शन शुक्रवारपासून ठाण्यात सुरू झाले. पाणी वाचवण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या ‘जलमित्र’ अभियानाचा शुभारंभ या प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आला. ठाण्याच्या कलाभवनातील तानसा दालनातील या प्रदर्शनाचा शुभारंभ महापौर संजय मोरे यांच्या हस्ते झाला आणि त्याद्वारे मुंबईतील ‘जलमित्र’ अभियानाची नांदी झाली. या वेळी स्थायी समितीचे सभापती संजय वाघुले, विरोधी पक्षनेते संजय भोईर, क्रीडा समितीचे सभापती काशिनाथ राऊत, भाजपाचे शहराध्यक्ष संदीप लेले, टीपटॉप प्लाझाचे मालक रोहितभाई शहा, सुरभी अॅडव्हर्टायझिंगचे संचालक यू.व्ही. नायर, सारथी अॅडव्हर्टायझिंगचे संचालक अमोल धर्मे, युनिक पब्लिसिटीचे संचालक अविनाश मिश्रा, दिग्दर्शक विजू माने, ‘लोकमत’चे फोटो एडिटर पद्मश्री सुधारक ओलवे, ‘लोकमत’ (मुंबई) चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, सहायक सरव्यवस्थापक राघवेंद्र शेठ आदी उपस्थित होते. ही मोहीम सुरू करण्यामागचा उद्देश आणि त्यामागील भूमिका पात्रुडकर यांनी विशद केली. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जोवर पाणीजागृतीचा संदेश पोहोचत नाही, तोवर पाणीबचत प्रत्यक्षात येणार नाही, या भावनेने ही मोहीम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदर्शनाचे उद्घाटन होताच ‘जलमित्र’ अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पाण्याची तीव्र टंचाई असतानाच्या काळातच पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवण्याचे अभियान हाती घेऊन ‘लोकमत’ने टाकलेल्या पावलाबद्दल सर्वच मान्यवरांनी भरभरून कौतुक केले आणि या अभियानाला हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिले. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवला पाहिजे, ही भावना दुष्काळाची दाहकता स्पष्ट करणारी लोकमतच्या छायाचित्रकारांची प्रत्येक फ्रेम पाहिल्यानंतर अधिक काळजाला भिडते, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. ठाण्यातील वेगवेगळ्या कार्यक्रमांत हे प्रदर्शन भरवण्याबाबत पुढाकार घेण्याची भावनाही व्यक्त केली. ठाण्यात जरी अशा प्रकारचा दुष्काळ नसला, तरी त्याची दाहकता जाणवल्यावर भविष्यातील पाणीटंचाईवर मात करता येईल, यावर त्यांनी भर दिला आणि ‘लोकमत’च्या साथीने आतापासून पाणीबचतीसाठी प्रयत्न सुरू करणार असल्याची ग्वाही महापौर संजय मोरे यांनी दिली. सहयोगी संपादक मिलिंद बेल्हे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले. (प्रतिनिधी)
‘लोकमत’च्या ‘जलमित्र’ अभियानाला छायाचित्र प्रदर्शनातून सुरुवात
By admin | Published: May 14, 2016 12:42 AM