Join us

मुंबईत सोमवारी रंगणार लोकमतचा ‘पॉलिटिकल आयकॉन’ सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2019 6:16 AM

कॉफी टेबल बुकचे होणार प्रकाशन

मुंबई : ‘लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स आॅफ मुंबई’ हा राजकीय क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान सोहळा सोमवार, ९ सप्टेंंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर परिसरातील राजकीय नेतेमंडळींना या वेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या वेळी एका विशेष कॉफी टेबल बुकचेही प्रकाशन करण्यात येणार आहे.

नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात सायंकाळी चार वाजता या सन्मान सोहळ्याला सुरुवात होणार आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना संघर्षातून राजकीय क्षेत्रात आपली ओळख निर्माण केलेल्या काही नामवंत राजकीय व्यक्तिमत्त्वांचा या वेळी गौरव करण्यात येईल. यानिमित्ताने एक विशेष कॉफी टेबल बुक आणि सन्मानचिन्ह त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.पॉलिटिकल आयकॉन्स आॅफ मुंबई, या कॉफी टेबल बुकमध्ये राजकारणात उत्कृष्ट कामगिरी करत स्वत:चे स्थान निर्माण केलेल्या, आपल्या कार्यातून मुंबईच्या अभिमानात भर घालणाऱ्या मुंबई प्रदेशातील नेत्यांच्या व्यक्तिरेखांचे संकलन आहे. मुंबई प्रदेशातील आघाडीच्या आणि महत्त्वाकांक्षी राजकारण्यांच्या यशोगाथेचे वर्णन यात आहे. राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसाठी एखाद्या वृत्तपत्राने अशा प्रकारचा सन्मान सोहळा आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.यांची प्रमुख उपस्थितीविधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण व क्रीडामंत्री आशिष शेलार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत राजकीय क्षेत्रातील नामवंतांचा सन्मान होणार आहे. याशिवाय वनाधिपती, माजी आमदार विनायकदादा पाटील आणि आदर्श ग्राम समितीचे कार्यकारी संचालक पोपटराव पवार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. राजकारण, समाजकारणासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, राज्यशास्त्र आणि माध्यमांचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

टॅग्स :लोकमतगिरीश महाजन