मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपायला आता फक्त काही तास राहिलेत. त्यात आज मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महायुतीची जाहीर सभा होत आहे. तर दुसरीकडे बीकेसी येथे इंडिया आघाडीची उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची सभा पार पाडतेय. मात्र प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे उद्या उद्धव ठाकरे एकाच दिवसात मुंबईत ४ सभा घेणार असल्याची माहिती आहे.
मुंबईत महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शनिवारी उद्धव ठाकरे ४ सभा घेणार आहेत. ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मतदारसंघात उद्धव ठाकरे ही सभा घेणार आहेत. या जागांवर उद्धव ठाकरे सेनेचे संजय दिना पाटील, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि अमोल किर्तीकर हे उमेदवार आहेत. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या सभेचा धुरळा उडणार असल्याचं दिसून येत आहे. ABP माझानं ही बातमी दिली आहे.
मोदी-राज यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष
मुंबईतल्या दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार असून महायुतीची सांगता सभा पार पडणार आहे. मुंबईतील या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
मोदी-राज यांच्या सभेपूर्वी संजय राऊतांचा हल्लाबोल
या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील काही दुकाने बंद होणार आहेत. त्यातील राज ठाकरे एक दुकान आहेत. तीन-चार सुपारी शॉप इन पॉलिटिक्स बंद होणार आहेत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्रात कोणीही येऊ दे, जितक्या सभा घेतील तितक्या त्यांच्या सीट कमी होतील. पंतप्रधान मुंबईत येऊन इतक्या सभा घेतात, म्हणजे तुम्ही दहा वर्षांत काही केले नाही म्हणून येत आहात. असे असते तर ज्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या, त्यांना मांडीवर घेऊन बसावे लागले नसते. राज ठाकरे ज्यांच्याबद्दल सवाल उठवतात, त्यांच्याबरोबरच जातात, ही राज ठाकरे यांची खासियत आहे अशी जहरी टीका राऊत यांनी केली.