महामुंबईच्या १० जागांसाठी आजपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ; ३ मे पर्यंत मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 10:36 AM2024-04-26T10:36:42+5:302024-04-26T10:39:34+5:30
आठवडाभरात तीन सुट्या; ६ मेपर्यंत अर्ज मागे घेता येणार
मुंबई/ठाणे : मुंबईतील सहा, ठाणे जिल्ह्यातील तीन आणि पालघर जिल्ह्यातील एक, अशा लोकसभेच्या १० जागांसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. शुक्रवार, दि.३ मेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. या आठवडाभराच्या मुदतीत तीन सुट्ट्या आल्याने प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याकरिता पाच दिवस उपलब्ध आहेत.
दाखल अर्जाची छाननी ४ मे रोजी होणार असून, ६ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. २७ व २८ एप्रिल रोजी शासकीय कार्यालयांना सुटी आहे, तर बुधवार १ में महाराष्ट्र दिन असल्यामुळे अर्ज दाखल करता येणार नाही
मुंबईत येथे भरता येणार अर्ज
मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, वांटे (पूर्व), तसेच मुंबई उत्तर पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, गोदरेज कॉलनी, विक्रोळी (पूर्व) त्याचप्रमाणे मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय ओल्ड कस्टम हाउस, जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज दाखल करता येतील.
आचारसंहिता जाहीर झाल्यापासून पाच गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत ४३७ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यांचे तत्काळ निराकरण करण्यात आले, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी गुरुवारी दिली. ठाण्यात १००% मतदारांचे फोटो १०० टक्के मतदारांचे फोटो मतदार यादीत समाविष्ट केले आहेत. सर्व मतदारसंघांमध्ये मतदान यंत्रांचे वाटप पूर्ण.