मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असं बोललं जातं आहे. भाजपा उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यात महाराष्ट्रातील काही जागांचा समावेश असेल. या यादीतून काही विद्यमान खासदारांना डच्चू मिळणार असल्याचं बोललं जाते. त्यात मुंबईच्या तिन्ही खासदारांचा समावेश असेल अशी चर्चा आहे.
मुंबईतल्या ६ जागांपैकी ५ जागा भाजपा तर एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार उभा राहणार आहे. त्यातील मुंबई उत्तर पश्चिम हा गजानन किर्तीकरांचा मतदारसंघ भाजपाला जाईल तर दक्षिण मध्य मुंबई या जागेवर शिवसेना उमेदवार उतरवेल. भाजपाचे मुंबईत खासदार आहे, ज्यात पूनम महाजन, गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांचा समावेश आहे. मात्र या तिन्ही खासदारांना डच्चू देऊन भाजपा नवीन चेहरे पुढे आणणार आहे.
पूनम महाजन यांच्याऐवजी आशिष शेलार, गोपाळ शेट्टींऐवजी पीयूष गोयल, मुंबई उत्तर पश्चिममधून अमित साटम, मनोज कोटक यांच्याऐवजी प्रविण दरेकर किंवा पराग शाह यांना भाजपा उमेदवार देण्याची शक्यता आहे. तर दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर यांना भाजपा उतरवणार असं बोलले जाते. गजानन किर्तीकरांची जागा शिवसेनेने भाजपाला सोडली असून त्याजागेच्या बदल्यात ठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेने आपल्या पारड्यात टाकून घेतली आहे.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला पण तिढा कायम
राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी ३४ ते ३५ जागा महायुतीमध्ये आपल्याकडे घ्या, असा हट्ट दिल्लीतील श्रेष्ठींकडे धरला असला तरी तो अद्याप मान्य झालेला नाही. त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादीने सन्मानजनक वाटा देण्यासाठी दबाव वाढविल्याने भाजपला हा आकडा गाठता येण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. आता भाजप ३१, शिवसेना १३ आणि राष्ट्रवादी ४ असा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. मात्र तिढा कायम आहे.