Join us  

निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 5:31 PM

भविष्यात निवडणूक आयोगाने काय काय काळजी घ्यावी याचा बोध घेऊन दुरुस्ती केली पाहिजे अशी मागणी दरेकरांनी केली. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडतंय. मुंबईत मोठ्या संख्येने मतदार मतदानासाठी उतरला आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी मतदान केंद्रावर लांबच्या लांब रांगा लागल्या. तिथे अनेक सुविधांची वानवा दिसून येत आहे. त्यावरून भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतदारांचे हाल हे दुर्दैवी आहे असं म्हटलं आहे.

प्रविण दरेकर म्हणाले की, निवडणूक आयोगाने पूर्णपणे लोकांचा, मतदारांचा, तेथे असणारे रूम्स, तेथील व्यवस्था, व्हेन्टीलेशन याचा कसलाही विचार केलेला दिसत नाही. हे दुर्दैवी आहे. त्यामुळे प्रचंड संख्येने जो मतदार आलाय तो तीन-तीन तास रांगेत उभा आहे. आम्हालाही मदतीच्या मर्यादा येतात. आचारसंहिता, पोलीस, निवडणूक आयोग या कचाट्यातून एका लिमिटच्या बाहेर काही करता येत नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच केवळ टीका करण्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची स्थिती उदभवली आहे त्या ठिकाणी खास उत्तर मुंबईतून पियुष गोयल, आम्ही आमदारांनी तेथील स्वयंसेवी संस्थांना पाणी, नाश्ता जी काही रिलीफ देण्याकरिता सूचना द्यायच्या आहेत त्या देऊन सहकार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. भविष्यात निवडणूक आयोगाने काय काय काळजी घ्यावी याचा बोध घेऊन दुरुस्ती केली पाहिजे अशी मागणी दरेकरांनी केली. 

दरम्यान, प्रत्येक बूथवर, पोलिंग सेंटरवर प्रचंड मतदारांची गर्दी होताना दिसतेय. मतदारांचा जबरदस्त अंडरकरंट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूने असल्याचे चित्र प्रथमदर्शनी दिसून येत आहे. आम्ही खरोखर त्यासमोर नतमस्तक होतो. त्याला धन्यवाद देतो. लोकशाहीचा उत्सव समजून आज त्रास होत असतानाही तीन-तीन तास मतदानाचा हक्क बजावताहेत हे खरोखर अभिनंदनीय आहे, कौतुकास्पद आहे. आम्ही त्यांच्या सहनशक्तीला निश्चितच सॅल्यूट करतो असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं. 

टॅग्स :प्रवीण दरेकरभारतीय निवडणूक आयोगलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४