मुंबई - महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर फिक्स झाल्याची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत जागावाटपावरून तिढा होता. २०१९ च्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा भाजपाला लढवायच्या होत्या. राज्यातील सत्तानाट्यानंतर राजकीय गणिते बदलली आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे २ गट झाल्याने महायुतीत भाजपा हाच मोठा भाऊ आहे.
सूत्रांनुसार, भाजपा ३१, शिवसेना १३ आणि राष्ट्रवादी ४ जागांवर निवडणूक लढवणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बारामती, शिरुर, रायगडसह परभणी ही जागा देण्यात आली आहे. तर १३ जागांवर शिवसेनेचे उमेदवार उभे राहतील. त्याबदल्यात मुंबईतील ५ जागांवर भाजपा लढणार आहे. शिवसेनेने उत्तर पश्चिम मुंबई जागेऐवजी ठाण्याची जागा निवडली आहे. त्यासोबत दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिवसेना जागा लढवेल असं बैठकीत ठरलं आहे.
दक्षिण मध्य मुंबईत सध्या विद्यमान खासदार राहुल शेवाळे आहेत. शिवसेना ठाकरे गट याठिकाणाहून अनिल देसाई यांना उमेदवार बनवण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले होते तेव्हा एकनाथ शिंदे यांनी १८ जागांची मागणी केली होती. या १८ जागा २०१९ मध्ये शिवसेनेने जिंकल्या होत्या. परंतु भाजपा १८ जागा सोडायला तयार नव्हती. त्यानंतर १५ जागांसाठी शिवसेना आग्रही होती. अखेर १३ जागा शिवसेना शिंदे गटाला सोडण्याची तयारी भाजपाने केली आहे.
बारामतीत सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार रंगणार सामना
बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे या जागेवर ३ वेळा खासदार बनलेल्या सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. १९५७ च्या आधी बारामती लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता. हा मतदारसंघ निर्माण झाल्यानंतर याठिकाणी केशवराव जेधे हे काँग्रेसचे खासदार बनले. १९५७ ते १९७१ पर्यंत ही जागा काँग्रेसच्या ताब्यात होती. त्यानंतर १९७७ मध्ये इथं जनता पार्टीचे संभाजी काकडे खासदार बनले. १९८४ मध्ये शरद पवार पहिल्यांदा बारामतीचे खासदार झाले. १९९१ नंतर आतापर्यंत ही जागा पवार कुटुंबाकडे आहे.