मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची घोषणा झाली, त्यात जागावाटप जाहीर करण्यात आले. यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येतेय. सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. परंतु या जागा मित्रपक्ष उबाठा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्यानं आता काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नाराजी समोर येत आहे.
आज मुंबई काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु या बैठकीला मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड या गैरहजर असल्याने बैठक रद्द करण्यात आली आहे. मुंबईतील ६ जागांपैकी केवळ २ जागा काँग्रेसला दिल्यात. त्यात दक्षिण मध्य मुंबईची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला गेली आहे. मविआतील जागावाटपानंतर ही नाराजी उफाळून आली. वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क होत नसल्याचं काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. महाविकास आघाडीत काँग्रेसची अवहेलना केली जातेय असा सूर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे.
मुंबईत सन्मानजनक जागावाटप होणं गरजेचे होते. परंतु ठाकरे गटाने मुंबईतील ४ जागांवर परस्पर उमेदवार जाहीर केले. त्यात दक्षिण मध्य मुंबई जागेवर अनिल देसाई यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी नाराज झाले. या जागेवर एकेकाळी काँग्रेसचे एकनाथ गायकवाड हे विजयी झाले होते. त्यामुळे ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह वर्षा गायकवाडांसह काँग्रेस कार्यकर्त्यांचा होता. परंतु ही जागा ठाकरे गटाला देण्यात आली त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी नाराजी थेट दिल्लीला फोन करून कळवली होती.
दरम्यान, वर्षा गायकवाड नॉट रिचेबल असल्याबाबत बातम्या येत होत्या, त्या खऱ्या नाहीत. मुंबई काँग्रेसची आज होणारी बैठक ही एक दिवसासाठी पुढे ढकलली आहे. आता ही बैठक उद्या होईल अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं दिसून येत आहे. मुंबईतील उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई ही जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. परंतु उत्तर मुंबई काँग्रेसला उमेदवारही सापडेना अशी स्थिती सध्या त्या मतदारसंघात आहे.