मुंबई : गेल्या पाच वर्षात महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांची संपत्ती ४७ लखांवरून तिप्पट वाढ होत दीड कोटींवर पोहचली आहे. दुसरीकडे, संपत्तीपेक्षा कर्जाचा डोंगर जास्त असल्याचे दिसून आले. मात्र, गेल्या पाच वर्षात १५ कोटीं ६२ लाखांचे कर्जाचा आलेख सव्वा सात कोटींवर आला आहे.
महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी निवडणूक कार्यालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, अकरावी पास असलेले कोटेचा हे व्यावसायिक आहे. त्यांनी आयकर विभागाकडे गेल्या पाच वर्षात सादर केलेल्या माहितीनुसार, २०१८ -१९ मध्ये त्यांचे उत्पन्न ४७ लाख ९७ हजार ७४० होते. कोविड काळात त्यात वाढ होत तेच उत्पन्न १९ -२० मध्ये ५३ लाख, २०-२१ मध्ये ७५ लाख ,२१-२२ मध्ये सव्वा कोटिवरून २२- २३ मध्ये दीड कोटी झाले आहे.
२०१९ मध्ये आमदारकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, मिहिर कोटेचा यांची जंगम मालमत्ता १५ कोटी १७ लाख ८१ हजार १७३ तर त्यांची पत्नी पायल यांच्या नावे १ कोटी २२ लाख इतकी आहे. २०२४ मध्ये तीच मालमत्ता ७ कोटी २३ लाख ६३ हजार ६०८ वर पोहचली आहे. तर, स्थावर मालमत्ता बाजार भावानुसार, ३ कोटी ६५ लाख ७२ हजार ५०० इतकी आहे. २०१९ मध्ये याच स्थावर मालमत्तेचे दर साडे तीन कोटी होते.
पत्नीकडूनही घेतले कर्ज...
२०१९ च्या प्रतिज्ञापत्रानुसार कोटेचा यांच्या डोक्यावर १५ कोटी ६२ लाख ६३ हजार ०९७ चे कर्ज होते. यामध्ये मर्सिडीज, क्रिस्टो, महिंद्रा सारख्या ९ वाहन कर्जाचाही समावेश होता. २०१९ मध्येच त्यांनी मर्सिडीज घेतली. २०२४ मध्ये यापैकी फक्त ७ वाहने असून त्यापैकी मर्सिडीज आणि क्रीस्टा हे दोन महागडे वाहन दिसून आले नाही. दुसरीकडे पत्नीकडूनही ४२ लाख ६५ हजार २२८ रुपयांचे कर्ज घेतले आहे. २०२४ पर्यंत पत्नीचे कर्ज २० लाख १९ हजार पर्यंत आले आहे. एकूण कर्जाची रक्कम ७ कोटी ३७ लाख ९५ हजारांवर आली आहे.
कर्जाचे सव्वा सात कोटी वसूल...
२०१९ मध्ये कोटेचा यांनी ९ कोटी २५ लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज दिले. २०२४ मध्ये हीच रक्कम १ कोटी ९७ लाख २२ हजारांवर आली. पाच वर्षात त्यांनी एकूण सव्वा सात कोटी रक्कम वसूल केली आहे. विविध शेअर्स मध्ये त्यांनी ३ कोटी ५८ लाखांची गुंतवणूक केली आहे. २०१९ मध्ये हाच आकडा साडे चार कोटी होता.
७४ तोळे सोने दीड किलो चांदी
कोटेचा यांच्याकडे २०१९ मध्ये ३ लाख १८ हजार किंमतीचे सोने तर पत्नीच्या नावे २२ लाखांचे सोने आणि १७ लाखांचे हिरेजडित दागिने असल्याचे नमूद होते. २०२४ मध्ये दागिन्याच्या किंमतीत वाढ होत हा आकडा एकूण पावणे एक कोटींवर गेला आहे. कोटेचा दाम्पत्यकडे एकूण ७४ तोळे सोने दीड किलो चांदी आणि हिरेजडित दागिने आहे.
उत्पन्न
वर्ष उत्पन्न
२०१८ - १९. ४७,९७,७४०
२०१९ - २० ५३,६४,५६०
२०२० - २१ ७५,७२,९९०
२०२१ - २२. १,३८,४८,११०
२०२२ - २३ १,५१,३६,४९०